|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वरुणराजाच्या साक्षीने अश्वाचे रिंगण

वरुणराजाच्या साक्षीने अश्वाचे रिंगण 

वार्ताहर/   मांजरी

पावसाच्या कोसळलेल्या सरींमध्ये चिंब झालेल्या मैदानात माउलींच्या अश्वांची पाऊले हळूवार पडू लागली अन् मैदानात एकच माउलींच्या नामघोषाचा गजर ऐकावयास मिळाला. ओल्या मैदानावर अश्वाने रिंगण पूर्ण केले आणि भारावलेल्या भाविकांची मने भक्तीरसाने तृप्त झाली. मांजरीवाडी परिसरात प्रसिद्ध असणारा हा रिंगण सोहळा वरुणराजाच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात पार पडला.

संत नामदेव महाराज व सावता महाराज समाधी सोहळय़ानिमित्त मांजरीवाडी येथे   विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंगळवार 30 रोजी व बुधवार 31 रोजी कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम पार पडले. मंगळवारी 9 वाजता महादजीराजे शितोळे सरकार यांच्या उपस्थितीत वीणा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

संत नामदेव महाराज समाधी सोहळय़ानिमित्त कृष्णानंद शास्त्राr वेदांताचार्य यांचे कीर्तन झाले. दुपारी 12 वाजता उमेश्वर भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. दुपारी 3 वाजता आण्णासाहेब लांडगे महाराज यांचा सहकाऱयांसह हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 4.30 वाजता विजय नलवडे-तामगाव, ज्ञानेश्वर पिराजी महाराज-येडूरवाडी यांचे प्रवचन झाले. रात्री 9 वाजता गुरुवर्य विठ्ठलदादा वास्कर महाराज-पंढरपूर यांचे कीर्तन झाले. रात्री 12 वाजता बाळगोंडा पाटील-जुगुळ, बाळू खोत-चंदूरटेक यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यांना सांगलीच्या सचिन जमदाडे यांची तबलासाथ मिळाली.

बुधवारी सकाळी 9 वाजता संत सावता महाराज समाधी सोहळय़ानिमित्त चंद्रकांत पाटील महाराज यांचे कालाकीर्तन झाले. भजनाच्या गजरात पालखी व अश्वाची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यामध्ये महिला मंगलकलशासह सहभागी झाल्या होत्या. श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांचे मांजरीवाडी ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले. दुपारी 12 वाजता माउलींच्या अश्वांचे उभे व गोल रिंगण पार पडले. यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम झाला. दुपारनंतर आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. जय हनुमान सार्वजनिक युवक मंडळ, माउली भजनी मंडळ व मांजरीवाडी ग्रामस्थांतर्फे व्यवस्थापन केले होते.