|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » धर्मशास्त्र

धर्मशास्त्र 

व्यासांनी जे धर्माचे विवेचन केले आहे, त्यात त्यांनी देशकाल परिस्थितीत व्यक्ती, राष्ट्र, समग्र जीवन, लोक आणि परलोक या सर्वांचे जो धारणपोषण करतो, तो धर्म होय असे सांगितले आहे. ‘धारयति इति धर्मः।’ अशी ती व्याख्या आहे. धर्म म्हणजे केवळ स्वर्गमोक्षाचा विचार नव्हे, तर या व्यावहारिक जगात जो लोकधारणा करतो, त्यांना सुखी, समृद्ध, परस्परपूरक, नीतीप्रवण आणि पुरुषार्थी बनवतो, तो धर्म होय. व्यासांच्या मते जीवन हे आनंदमय असले पाहिजे. ते जसा कर्मवाद मानतात, तसा दैववादही मानतात. ते आत्मतत्वावरही विश्वास ठेवतात. मनुष्याला ते केंद्रबिंदू मानतात. म्हणूनच त्याला त्यांनी पुरुषार्थाचा उपदेश केला आहे.  वेदांगाची जी सहा सूत्रे आहेत. त्यातील कल्पसूत्रांच्या तीन विभागांतील एक धर्मसूत्रे आहेत. त्यात पारलौकिक, सामाजिक आणि नैतिक कर्तव्यांविषयी चर्चा केली आहे. सामाजिक आचारविचार, वर्णाश्रम यांची विस्तृत मीमांसा आहे. तसेच राज्यव्यवस्था आणि करविषयक कायद्यांबाबतही योग्य व्यवस्था वर्णन केली आहे.

धर्माधर्म व कर्तव्याकर्तव्य यांच्या निर्णयाचे शास्त्र म्हणजे धर्मशास्त्र होय. त्यात हक्कापेक्षा कर्तव्यावरच अधिक भर दिला आहे. कर्तव्य म्हणजेच धर्म होय, तसेच धर्म आणि नीती ह्या दोन वेगळय़ा गोष्टी मानल्या आहेत. ‘सत्यं वद। धर्मं चर।’ असा उपदेश केला आहे. म्हणजे खरे बोललेच पाहिजे आणि धर्माचेही आचरण केले पाहिजे असा आशय.

धर्मशास्त्रीय वाङ्मयाचे तीन कालखंड मानले आहेत. 1) इ.स.पू.600-100, 2) इ.स.100- 800 आणि 3) इ.स.800-1800. पहिल्या कालखंडात धर्मसूत्रे आणि मनुस्मृती यांची रचना. दुसऱयात इतर स्मृतींची रचना, तिसऱयात स्मृतींवर टीका व निबंध यांची रचना झाली.

धर्मशास्त्र म्हणजे धर्माविषयी निर्णय देणारे ग्रंथ. वेदांना श्रुती म्हटले जाते आणि स्मृतींना धर्मशास्त्र म्हटले जाते. ‘धर्मशास्त्रं वै स्मृतिः।’ असे मनुचे वचन आहे. सूत्ररूपात यांची रचना आहे. सर्व स्मृतिंमध्ये मनुस्मृती अधिक प्रमाण मानली जाते. त्यानंतर याज्ञवल्क्मय याची स्मृती. त्याखालोखाल पराशर, नारद, बृहस्पती, कात्यायन इ. अनेक स्मृतिकार येतात. टीकाकारांमध्ये मेधातिथीला प्रमुख मानावे लागेल. त्याच्या मते कृतयुगामध्ये मनू, त्रेतायुगात गौतम आणि द्वापारयुगात शंखलिखित स्मृती प्रमाण होत्या. कलियुगात पराशर स्मृती प्रमाण मानावी असे तो म्हणतो.

अलीकडच्या काळात काशिनाथ उपाध्याय ऊर्फ बाबा पाध्ये यांचा ‘धर्मसिंधू’ हा ग्रंथ भारतात सर्वत्र मान्यता पावला आहे. काशिनाथ उपाध्याय हे पंतकाव्याचे अग्रणी मोरोपंत पराडकर यांचे व्याही. धर्मसिंधू ग्रंथाचे तीन भाग आहेत. पहिल्यात कालाचे भेद, संक्रांतीचा पर्वकाळ, वर्ज्यावर्ज्य कर्मे, तिथींचा निर्णय इ. विषय आहेत. दुसऱयात चैत्रादी बारा मासांतील कृत्ये, दशावतार जयंत्या, ग्रहांची दाने इ. अनेक विषय आहेत. तिसऱयात पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. पूर्वार्धात गर्भाधान, पुंसवनादी संस्कार, तर उत्तरार्धात श्राद्धाचे अधिकारी, श्राद्धभेद, प्रेतसंस्कार,संन्यास इ.चे विवेचन आहे. अलीकडच्या काळात कोणताही अभ्यास न करता धर्माविषयी अनेक समज-अपसमज पसरवण्याचे काम मात्र जोरात सुरू असते!

Related posts: