|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ओहोटीचे आव्हान शरद पवार पेलणार?

ओहोटीचे आव्हान शरद पवार पेलणार? 

राष्ट्रवादीला ओहोटी लागलेली असताना ‘पूर्वीही मी सहाचे साठ करून दाखवले आहेत’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार छातीठोकपणे सांगत आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन गट ही त्यांची जुनी नीती आहे. फडणवीस त्यामुळेच शिवसेनेला जपत आहेत.

 

तीन आमदारांना फोडणे म्हणजे मेगाभरती नव्हे असे आघात मी अनेकदा पचवले आहेत. सहाचे साठ करून दाखवले आहेत असे आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य पाऊणशे वयोमानाचे ज्येष्ठ नेते शरद पवार जितक्या आत्मविश्वासाने करत आहेत तितका आत्मविश्वास सध्या राज्यात फक्त सत्ताधारी भाजपमध्येच दिसतो. त्यांच्या राजकारणाला सध्या ‘अच्छे दिन’ सुरू असताना हे समजू शकते. मात्र ज्यांच्या पक्षाला ‘बुरे दिन’ सुरू आहेत. एकाच वेळी घरातली तीन तीन नातवंडे विधानसभेला उमेदवारी मागत आहेत. साहेब हृदयात आहेत असे सांगत नेते पक्ष सोडत आहेत, अनेक आमदार पक्षाच्या बैठकांना दांडय़ा मारत आहेत. नाशिकसारख्या जिल्हय़ात बैठका लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत. अशा काळात पवार मात्र ठामपणे आणि मिश्किल टिप्पणी करत आहेत. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत गेले. महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, त्यांचे आमदार पुत्र, माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक आणि सातारचे छत्रपती परिवाराचे सदस्य शिवेंद्रराजे भोसले अशा दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरे माजी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि आ. लाड यांच्या बाबत चर्चा आहे. गणेश नाईक यांच्यासह अनेक आमदारही पक्ष सोडतील, त्यासाठी मोठा कार्यक्रम होईल असे सांगितले जात असताना शरद पवार थांबलेले नाहीत. त्यांनी जखमी असून मुंबईत हर्षवर्धन पाटलांच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. तातडीने दुसऱया महिला प्रदेशाध्यक्ष नेमल्या. कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांचे उदाहरण देऊन पक्ष सोडण्यासाठी सरकार दबाव आणत असल्याचे दाखवून दिले. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या पुतण्याशी संपर्क सुरू केला, पुण्यात युवक राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात युवकांकडून शपथ घ्यायला लावली. शिवस्वराज्य यात्रेची घोषणा करून त्याचे नेतृत्व खा. अमोल कोल्हेंना दिले. साताऱयात राजमाता कल्पनाराजे भोसलेंसह शिवेंद्रराजेंची भिस्त असणारे आपल्या पक्षातच राहतील अशी चाचपणी केली. तिथे कल्पनाराजे, दमयंतीराजे किंवा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना जावलीतून उभे करण्याची रणनीती आखली. तातडीने सांगली गाठली. जयंत पाटील यांच्याकडे यापुढे नेतृत्व असेल याची त्यांच्या कार्यकर्त्यांना खात्री दिली. पक्षातील कुणी वेगळा निर्णय घेत असतील तर त्यांना शुभेच्छाही दिल्या. पवार हे सगळे करू शकतात कारण केंद्रातल्या सत्तेचे फटके त्यांनी अनेकदा खाल्ले आहेत. इंदिरा गांधींनी त्यांचे सरकारही बरखास्त केले होते. परिणामी पवारांनी नेहमीच प्रत्येक तालुक्यात दोन गटांना मोठे करत ठेवले आहे. माढा मधून मोहिते पाटील लढणारही नाहीत आणि सोडून जाणार हे लक्षात येताच, भाजपशी जवळीक वाढलेल्या जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांनाच त्यांनी तिकीट दिले होते. भुजबळ, तटकरे या माजी प्रदेशाध्यक्षांसह काही आमदारांनी आपण पक्षातच राहू असे स्पष्ट केले आहे. नवी मुंबईतील 52 पैकी 20 नगरसेवक माघारी परतले ही त्याचीच फलश्रुती आहे. आता भाजपने सलग दुसऱयांदा विधानसभेला त्यांचीच माणसे फोडण्याचे निर्माण केलेले आव्हान या विधानसभेला पवार कसे परतवणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाजनादेश यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या चार आमदारांना पक्षात घेण्याचा समारंभ उरकून घेतला. एका बाजूला पक्षात आलेल्या या नेत्यांचे ते स्वागत करीत आहेत आणि दुसरीकडे ज्यांना मागे टाकून नवख्या फडणविसांनी पाच वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपद पटकावले होते ते पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, मंत्री मुख्यमंत्री अधिक बळकट होत असल्याचा हा सोहळा चुपचाप पाहत उभे आहेत असे चित्र सर्व माध्यमांमधून प्रसिद्ध झाले. आता आम्ही हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. दुसऱया दिवशी शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध पश्चिम विदर्भातून त्यांनी यात्रा सुरू केली. कारण याच ठिकाणचे आनंदराव आडसूळ आणि हंसराज अहिर हे युतीचे दोन दिग्गज लोकसभेला जनतेने पराभूत केले आहेत. पूर्व आणि पश्चिम विदर्भ अशी वाटणी होऊन काँग्रेस आणि वंचितला आपल्या बालेकिल्ल्यात फायदा होऊ नये याची तजवीज यात्रा तिथून सुरू करण्यामागे आहे. शिवाय शहरी भागाबरोबरच ग्रामीण महाराष्ट्रात मते वाढविण्यासाठी तुकडोजींच्या प्रतिमेला स्वीकारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पाच वर्षातील निवडणुकांमध्ये भाजप 34 टक्के, शिवसेना 19 टक्के, काँग्रेस 20 टक्के आणि राष्ट्रवादी 18 टक्के हीच मतांची टक्केवारी राहिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व शिवसेनेला अजिबात जुमानायचे नाही असे म्हणत असले तरी मुख्यमंत्री त्यामुळेच सेनेला जपत आहेत. वंचितच्या प्रयोगाचा आपणासही फटका बसला आणि सोबतच्या छोटय़ा पक्षांना मतदारांनी नाकारले तर अडचण नको याचीही त्यांची तयारी दिसते. उद्या सेनेला सोडून स्वबळावर लढावे लागले तर राष्ट्रवादीच्या दिग्गजांना पक्षात आणून आपल्या जागा वाढत्या राहतील आणि सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसणार नाही याची तजवीज चालवली आहे. मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱया शिसेनेनेही आपला दबाव कायम राखत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे आणले आहे.  यात्रेद्वारे राजकीय वक्तव्ये टाळत पक्ष आणि मतदारांना रिचार्ज करणे सुरू केले आहे. यामुळे मोकळीक मिळालेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून 288 मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकाऱयाशी एकटय़ाशीच बंद खोलीत उद्धव ठाकरे थेट चर्चा करत आहेत. इतर नेत्यांनाही तिथे प्रवेश नसल्याने हा नवा आणि वेगळाच प्रयोग सेनेच्या पदाधिकाऱयांत उत्साह वाढविणारा ठरत आहे. भाजपने छोटय़ा पक्षांना घेऊन गत निवडणुकीत केलेले राजकारण काँग्रेस-राष्ट्रवादीही करू लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमागे राजू शेट्टींची जनआक्रोश यात्रा जाईल ती याच धोरणातून. दुसरीकडे राज ठाकरे इव्हीएम विषयावर देशभरातील नेत्यांना भेटत आहेत. हा आघाडीच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दाही होऊ शकेल.  वंचितशी जमणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना फक्त चुचकारण्याचे राजकारण आघाडीने चालवले आहे. मुस्लीम मतदार आघाडी बरोबर राहतील असा त्यांचा कयास असला तरी त्यांच्यासह दलित आणि ओबीसी, धनगरांसाठी 11 तारखेला पंढरपुरात प्रियांका गांधींना आणून एका सभेद्वारे नवा प्रयोग आघाडीने चालवला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे एक-एक घटक जोडण्याचे राजकारण दिसत आहे.

शिवराज काटकर

Related posts: