|Thursday, January 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सक्षम पालक, सशक्त स्तनपान: निरोगी बाल्याची वाटचाल

सक्षम पालक, सशक्त स्तनपान: निरोगी बाल्याची वाटचाल 

‘सक्षम पालक, सशक्त स्तनपान’ हे या वषीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्मय आहे. या घोषवाक्मयात बालसंगोपनाच्या वर्तमानातील आणि भविष्यातील वाटचालींचा गर्भितार्थ दडलेला आहे. जागरुक पालकत्व ही काही कायद्याने आणता येणारी बाब नाही. त्यासाठी जनमानसात प्रबोधनाद्वारे स्वभाव घडविणाऱया कृती-योजना अंमलात यायला हव्यात. दरवषी ‘स्तनपान सप्ताहा’च्या निमित्ताने स्तनपानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो. शासकीय, खासगी आरोग्य संस्थांमार्फंत/व्यवस्थांमार्फंत असे प्रयत्न विविध स्तरावर होताना दिसत आहेत. परंपरागत अनिष्ट समजुतींचा पायंडा मोडून हळूहळू समाज शास्त्रीयतेची कास धरत असल्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतातील दर हजार जन्मामागील बालमृत्युदर (39.4), शिशु मृत्युदर (32) आणि नवजातशिशु मृत्युदर (24) आटोक्मयात आणण्याचे प्रयत्न होताना दिसून येत आहेत. नवजात शिशु आणि बालमृत्युंचे प्रमाण आधीच्या तुलनेत कमी होताना दिसत आहे. मात्र अजून खूप मोठा पल्ला गाठणे बाकी आहे.

शिशुच्या जन्मापासून एक तासाच्या आत त्याला स्तनपान दिले गेले तर नवजात शिशु संसर्गाच्या जोखमीपासून कितीतरी पट दूर राहू शकतो. वैश्विक स्तरावर जवळपास आठ लाख बालके जन्मानंतर काही तासाच्या आत स्तनपान मिळाल्याने वाचू शकतात. नवजात शिशुला योग्य पद्धतीने आणि उचित वेळेत स्तनपान मिळावे याकरिता गर्भवती महिलांची आधीपासूनच सकारात्मक तयारी केली गेली पाहिजे. काही खासगी रुग्णालयात या विषयीच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. पहिल्यांदाच जी स्त्री माता होत आहे, तिला बाळाला कसे धरावे, स्तनपान देताना बाळ आणि मातेची शारीरिक स्थिती कशी असावी, स्तनपान किती वेळा करावे, मानसिक स्थिती यासारख्या गोष्टींबाबत कल्पना नसते. एका नवीन जीवाचा जन्म होणे हा एक आनंदोत्सव असतो. यात कुटुंबातील सर्वचजण सहभागी झाले तर मातेसाठी हा अवघड प्रवास अधिक सुखकर होतो. जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपानाचे महत्त्व हे मातेबरोबरच तिची काळजी घेणाऱया कुटुंबातील सर्वांनीच समजून घेतले पाहिजे.

बाळाच्या जन्मानंतर लगेचच स्तनपान देण्याबाबत अजूनही बऱयाच प्रमाणात गैरसमज आहेत. प्रसूत मातेला येणारे पहिले दूध हे घट्ट पिवळसर रंगाचे असते. बोलीभाषेत त्याला बरेचदा ‘चीक’ असे संबोधले जाते. शास्त्रीय भाषेत त्याला ‘कोलेस्ट्रोम’ म्हणतात. याच पहिल्या दुधामुळे बाळाची प्रतिकारशक्ती कितीतरी पटीने वाढत असते. मात्र नेमके हेच दूध अनेक गैरसमजुतींमुळे फेकून दिले जाते. त्याऐवजी बाळाला मध चाटवणे, साखर-पाणी देणे, गाईचे-शेळीचे दूध देणे अशा अनावश्यक-चुकीच्या गोष्टी केल्या जातात. बाळाच्या जन्मानंतर तासाभराच्या आत मातेचे दूध न देता मध, पाणी, गुटी (प्री-लॅक्टल) यासारखे द्रव पदार्थ दिल्याने त्याचा परिणाम शिशुच्या प्रतिकार क्षमतेवर तर होतच असतो, बरोबरीने मातेवरही होतो. माता जेव्हा शिशुला स्तनपान देते तेव्हा आपोआपच नव्याने दूध तयार होण्याची संप्रेरके तयार होत राहतात, जी मातेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात. स्तनपानामुळे बाल-शिशु मृत्यु दर कमी होण्यास तर मदत होतेच शिवाय स्तनपान देणाऱया महिलांना स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, मधुमेह (टाईप 2), हृदयाच्या आजाराचा धोका कमी होत असतो.   

जन्मानंतर एक तासाच्या आत नवजात शिशुला अमृतासमान हे पहिले दूध मिळावे याकरिता आवश्यक ती तयारी गर्भावस्थेपासूनच होणे गरजेचे आहे. गर्भवती असतानाच स्तनपानाच्या वेळेस काय काय बाधा येऊ शकतात याची कल्पना गर्भवती मातांना देणे आवश्यक आहे. अनेकदा दुखरे स्तन, आत गेलेले निपल्स, निपल्सला जखमा वा चिरा असणे यासारख्या समस्या स्तनदा मातेस उद्भवू शकतात. या समस्येकरिता डॉक्टरांची योग्य वेळी मदत घेऊन त्यावर वेळीच उपचार केल्याने स्तनदा माता बाळाला आनंदाने स्तनपान देऊ शकते. स्तनपान देताना योग्य स्थिती कोणती हे देखील गर्भवती/स्तनदा मातांना समजून सांगणे गरजेचे आहे. बरेचदा केवळ निपल्स बाळाच्या तोंडात दिले जाते, त्यातून बाळाला दूध घेता येत नाही. बाळाला व्यवस्थितरित्या दूध ओढता यावे याकरिता निपल्सच्या कडेचा पूर्ण काळा भाग बाळाच्या तोंडात असणे गरजेचे असते. तसेच बाळाची हनुवटी मातेच्या स्तनास टेकलेली असावी. स्तनपान देतेवेळी मातेने आनंदी आणि प्रसन्न राहावे. बाळाला दूध देण्याच्या ठरावीक वेळा न ठरवता ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर बाळाला दूध देत रहावे. मातेला केवळ दूध-भात, वरण-भात, साजूक तुपातील शिरा असा आहार न देता संपूर्ण आहार द्यावा.

बाळ जोपर्यंत गर्भात असते तोपर्यंत आईच्या आहारातूनच त्याचे पोषण होत असते. जन्माला आल्यानंतर मात्र बाळाला स्वत:हून दूध ओढणे, गिळणे यासारखे कष्ट करायचे असतात. सुरुवातीलाच जर बाळाला चमच्याने अथवा बाटलीने दूध दिले तर बाळ स्तनपान घेण्यास नकार देऊ शकते. बाळाला जितक्मया दुधाची आवश्यकता असते तितके दूध स्तनामध्ये तयार होत असते. अनेकदा बाळ रडते याचा अर्थ बाळाचे पोट भरत नाही असाच घेतला जातो आणि त्याला वरचे दूध सुरू केले जाते. परंतु अनेकदा मच्छर-मुंगी चावणे, मालिश करतेवेळी जोरात चोळले जाणे वा शेक देतेवेळी नाका-तोंडात धूर जाणे, कंटाळा येणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे बाळ रडू शकते. त्यामुळे या गोष्टींचा पोट भरण्याशी संबंध न लावता बाळाला सहा महिन्यांच्या आधी वरचे दूध, पाणी वा इतर द्रव पदार्थ अजिबात देऊ नये. या काळात बाटलीने दूध दिल्यास बाळाला बाटलीने दूध घेणे अधिक सोयीस्कर असल्याने ते स्तनपान करणे सोडून देते. याचे दुष्परिणाम बाळाच्याच आरोग्यावर होतात. अतिसार, कुपोषण यासारख्या समस्या बाळाला मृत्युच्या दाढेत ओढू शकतात. मातेचे दूध हे कोणत्याही ऋतुत आवश्यक तेवढय़ाच तपमानाला बाळासाठी सहज उपलब्ध असते. शिवाय निर्जंतुकीकरण, स्वच्छता आदि गोष्टींची कटकट नसते. केव्हाही, कुठेही माता बालकास सहजरित्या स्तनपान देऊ शकते. बाळाच्या आवश्यक असलेल्या पाण्याची गरजही आईच्या दुधातूनच पूर्ण होत असते. दोन वर्षे वा अधिक काळापर्यंत बाळाला स्तनपान देणे हे बाळाच्या शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाकरिता अत्यंत आवश्यक आहे.  

‘सक्षम पालक, सशक्त स्तनपान’ प्रत्यक्षात आणण्याकरिता जागरुक पालकत्वा आधीही नियोजित पालकत्व ही संकल्पना आपल्याकडे रुजायला हवी. नुकताच ‘जागतिक लोकसंख्या दिन’ (11 जुलै) पार पडला आहे. पृथ्वीवरील उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा होणारा ऱहास आणि वाढती लोकसंख्या यांच्या व्यस्त मांडणीमुळे ओढवणाऱया विनाशाला लोकसंख्येवरील नियंत्रण अत्यावश्यक आहे. नियोजित पालकत्व यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याची सुरुवात ‘लिंगभाव समानते’ पासून करावी लागेल. लिंगभाव समानता जेव्हा नव्या पिढीमध्ये उतरेल तेव्हाच पालकत्वाची जबाबदारी जाणीवेने स्वीकारली जाईल. ‘पॅटर्निटी लिव्ह’ मिळणारे अथवा न मिळणारे पिता जेव्हा सजगतेने पालकत्वाची अनुभूती आणि आनंद घेतील, तेव्हाच उद्याची निरोगी, संस्कारक्षम पिढी तयार होईल.         

डॉ. स्वाती अमराळे-जाधव

Related posts: