|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » यात्रांची मांदियाळी

यात्रांची मांदियाळी 

यात्रा, जत्रांसाठी  महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. आपल्या लोकसंस्कृतीशी त्याची नाळ जुळली आहे. श्रद्धा आणि भक्तीचा एक सुरेख मेळ यातून साधला जातो. जोतिबा, खंडोबा, जेजुरी, आषाढी, त्र्यंबोली या विविध यात्रांमधून  भाविकांची सुंदर वीण विणली आहे. म्हणूनच यात्रा या जनसंवादाचे पूल आहेतच, शिवाय त्यात होणारी थेट गळाभेट हे त्याचे वैशिष्टय़ राहिले आहे. बैलगाडय़ांच्या बैलांच्या घुंगुरमाळांचा नाद करणारी पूर्वापार चालत आलेली यात्रासंस्कृती वेगवेगळी वळणे घेत आता वेगळय़ा टप्प्यावर येऊन ठेपली आहे. जनसंपर्काची ताकद लक्षात घेऊन त्याच्यावर आता राजकारण्यांची सावली पडत असून, सोशल मीडियाच्या निवडणूक प्रचार युगात नेतेमंडळींना पुन्हा यात्रेचीच भुरळ पडली, याला काय म्हणावे? एक तर राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. विधानसभा निवडणुकीचा फड जसा जवळ येत आहे तशी महायात्रांची मांदियाळी सुरू झाली आहे. भाजपची महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा, या दोघांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवराज्य यात्रेने राज्यातील जनता यापुढील काळात यात्रा सोहळय़ात न्हाऊन निघणार आहे. महाजनादेश यात्रेचे नेतृत्व भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जनआशीर्वाद यात्रेची सूत्रे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तर शिवराज्य यात्रेचे नेतृत्व अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे करत आहेत. राज्यातील विविध राजकीय पक्षांचे वारकरी, त्यांच्या दिंडय़ा-पताका घेऊन या सोहळय़ात सामील होतील. भाजप-शिवसेनेमध्ये सध्या विरोधी पक्षातील मातब्बर फोडण्याची एक जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्री पदाचा सुप्त संघर्ष या दोन मित्रपक्षातील मतभेदास कारणीभूत आहे. अखेर सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशा आकडय़ांची गरज असते, हे वास्तव आहे. ज्या  पक्षाचे आमदार जास्त तोच मुख्यमंत्रिपदासाठीचा दावेदार असे एकदा सूत्र ठरल्यानंतर आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील, याची व्यूहरचना करण्यात भाजप आणि शिवसेनेची नेतेमंडळी दंग आहेत. केवळ सरकार चालवण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आहेत, एकत्र राहतील. अन्यथा गेल्या पाच वर्षात सत्तेत राहून सेनेने कडव्या विरोधी पक्षाचीच भूमिका बजावली आहे. म्हणूनच दोन्ही पक्षांची नेतेमंडळी विरोधी पक्षातील ताकदवर नेत्यांना चुचकारत आहेत. मुख्यमंत्रीपद गमावल्याचे शल्य उद्धव ठाकरे यांना निश्चित असणार. या सत्तास्पर्धेतूनच शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रेला पंधरा दिवसांपूर्वी सुरूवात केली. सध्या शिवसेनेत ‘आदित्य ट्रेंड’ जोरात आहे. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा  चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांना पुढे आणल्यास भाजपला आपण चांगली टक्कर देऊ शकतो, असा मोठा मतप्रवाह शिवसेनेत आहे. मते मागण्यासाठी नव्हे तर ही तीर्थयात्रा असल्याचे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत. ज्यांनी मतदान केले, त्यांचे आभार मानण्यासाठी व ज्यांनी मतदान केले नाही, त्यांची मने जिंकण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 15 वर्षात काँग्रेस आघाडीने जे केले नाही, ते पाच वर्षात युती सरकारने करून दाखवले. याचा ताळेबंद जनतेसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महाजनादेश यात्रेला 1 ऑगस्टपासून सुरूवात झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी अमरावती जिल्हय़ातील मोझरी (गुरुपुंज) येथून या यात्रेस प्रारंभ झाला. ही जनादेश यात्रा 32 जिल्हय़ातून 152 विधानसभा मतदारसंघात भेट देईल. या यात्रांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेदेखील शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. आभाळ फाटले त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार, अशी अवस्था सध्या राष्ट्रवादी पक्षाची आहे. अशा अवस्थेत उसने अवसान आणून का होईना या पक्षाचे प्रमुख शरद पवार पक्षातील कार्यकर्त्यांना धीर देताना पाहून, त्यांच्या जबर आत्मविश्वासाला दाद द्यावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील विजयाच्या वारूने देशाच्या चारही दिशा पादाक्रांत केल्या. या लाटेचा तडाखा इतका जबरदस्त होता की, विरोधी नेत्यांचे मनोधैर्यच गळून पडले. कोणत्याही महत्त्वाकांक्षी नेत्याला अन्य कोणत्याही अपयशापेक्षा राजकीय अपयशाची प्रचंड भीती वाटत असते. राजकीय भवितव्याच्या भीतीने त्यानंतर पक्षांतराची एक लाटच तयार झाली. काँग्रेस सध्या नेतृत्वहीन तर राष्ट्रवादीला मोठय़ा प्रमाणात गळती लागली आहे.  मोहिते-पाटील पितापुत्रांपाठोपाठ पिचड, अहिर, नाईक, वाघ, शिवेंद्रराजे, गणेश नाईक आदी राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पाठोपाठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. ‘आई जेवू देईना, बाप भीक मागू देईना,’ अशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे. राहुल गांधींच्या पदत्यागानंतर अद्यापही या पक्षाला पक्षाध्यक्ष निवडता आलेला नाही. नेहरू, गांधी घराण्याबाहेरचाच अध्यक्ष शोधा, असे बजावूनही नेते अजून प्रियांकाचीच आळवणी करीत आहेत. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीच्या मुलाखतीकडे बडय़ा नेत्यांनी पाठ फिरवली आहे. आघाडीतील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यातच सध्या यात्राकाळ आहे. निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेच्या दर्शनासाठी लगबग सुरू असून भाजप-सेनेच्या गाडीचे तिकीट मिळते का, याची चाचपणी विरोधी पक्षातील नेते करत आहेत. यात्राकाळात  भाजप-सेनेने जादा गाडय़ांची सोय व ‘विशेष पॅकेज’चे नियोजन केले आहे. स्थानकात विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची भली मोठी रांग लागली आहे. फलाटावर अन्य पक्षांच्या गाडय़ा असूनही, कुणाचे चाक पंक्चर, तर कुणाचे चाक निसटून पडले आहे, तर कुणाच्या गाडीला मुसळधार पावसात गळती आहे. एका गाडीच्या चालकाचा पत्ताच नाही. साहजिकच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गाडय़ांमधून उतरून नेतेमंडळी भाजप-सेनेच्या गाडीत बसण्यासाठी धडपडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे चालक हताश होऊन शून्य नजरेने हा तमाशा पहात आहेत. प्रवाशांची गर्दी हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, पात्र प्रवाशांनाच एसटीत प्रवेश दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना जाहीर करावे लागले. भाजप, सेना, राष्ट्रवादीच्या राजकीय यात्रा अखेर कुणाला पावतील आणि मुख्यमंत्रीरूपी ‘विठ्ठल’ कोणाला दर्शन देईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Related posts: