|Monday, December 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अणुकरारातून अमेरिका बाहेर

अणुकरारातून अमेरिका बाहेर 

ट्रंप प्रशासनाचा निर्णय, शस्त्रास्त्र स्पर्धा वाढणार ? शीतयुद्ध काळात रशियाशी होता करार 

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

 शीतयुद्धाच्या काळात रशियाशी केलेल्या अण्वस्त्र नियंत्रण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. इंटरमिडीएट रेंज न्यूक्लिअर फोर्स ट्रीटी (आयएसएफ) या नावाने हा करार ओळखला जातो. या करारांतर्गत 500 किलोमीटर ते 5,500 किलोमीटरच्या टप्प्यात मारा करणाऱया क्षेपणास्त्रांचे उत्पादन थांबविण्यात आले होते.

या कराराचा भंग प्रथम रशियाने केल्याचा आरोप या वर्षाच्या प्रारंभी अमेरिका व नाटो करार देशांनी केला होता. रशियाने नव्या प्रकारची क्रूझ क्षेपणास्त्रे नियुक्त केली आहेत. त्यामुळे कराराचा भंग होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. रशियाने 9 एम 729 प्रकारची अनेक क्षेपणास्त्रे नियुक्त केल्याचा पुरावा आमच्यापाशी असल्याचा अमेरिकेचा दावा
आहे.

रशियाच जबाबदार असल्याचा आरोप

हा करार मृतवत होण्यासाठी रशियाच जबाबदार आहे. रशियाने करार धाब्यावर बसविल्याने अमेरिका व तिचे युरोपियन सहकारी देश यांना आपल्या सुरक्षेसाठी करारातून बाहेर पडणे आवश्यक झाले, असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपिओ यांनी केले. त्यानंतर रशियानेही हा करार संपल्याची घोषणा आपल्या नोव्होस्ती या सरकारी वृत्तपत्रातून केला.

शस्त्रास्त्र स्पर्धा वाढणार

हा करार संपविण्यासाठी प्रथम कोण जबाबदार आहे, हा प्रश्न बाजूला ठेवला तरी यामुळे पुन्हा जगात शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीला लागण्याची चिन्हे आहेत, असा इशारा आंतरराष्ट्रीय तज्ञांनी दिला आहे.

आता दोन्ही महासत्ता उघडपणे मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचे उत्पादन करण्यास मोकळय़ा आहेत. त्यांचेच अनुकरण इतर राष्ट्रेही करतील. परिणामी, शस्त्रास्त्रस्पर्धा वाढीस लागेल, असा विचार व्यक्त करण्यात येत आहे.

या कराराअंतर्गत दोन्ही देशांच्या एकमेकांची क्षेपणास्त्रे तपासण्याचा अधिकार देण्यात आला होता. तो आता संपला आहे. याच कराराचा एक भाग म्हणून 1991 पर्यंत दोन्ही देशांनी 2 हजार 700 अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे नष्ट केली होती. त्यावेळी जग अण्वस्त्रमुक्त होणार असा आशावाद व्यक्त करण्यात आला होता. तथापि, त्यापुढे या दिशेने फार प्रगती होऊ शकली नाही. आता करारच रद्द झाल्यात जमा आहे.

Related posts: