|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात स्वाईन फ्लूचा पहिला बळी

साताऱयात स्वाईन फ्लूचा पहिला बळी 

महागाव येथील महिलेचा मृत्यू : साथीच्या रोगावर वेळीच उपचार घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी / सातारा

पावसाने चांगले थैमान घातल्यानंतर साथीच्या रोगांनी जिल्हय़ात फैलाव केला आहे. यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मात्र, शुक्रवारी स्वाईन फ्लूने जिल्हय़ातील पहिला बळी गेल्याची घटना घडली. महागाव (ता. सातारा) येथील स्वाईन फ्लू झालेल्या एका महिलेचा शुक्रवारी पुणे येथे उपचार सुरू असताना सकाळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, साथीच्या रोगावर वेळीच उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

  याबाबत चिंचणेर वदंन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शशिकला रघुनाथ कदम (वय 44) रा. महागाव, ता. सातारा यांना चार दिवसापूर्वी सर्दी, ताप, खोकला येत होता. त्यांनी गावातीलच एका खासगी डॉक्टरकडे तपासणी करून औषधे घेतली. मात्र काहीच फरक न पडल्याने त्यांनी संगमनगर, सातारा येथील एका डॉक्टरला दाखवले. संबंधित डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता शशिकला कदम यांना स्वाईन फ्लूची लक्षण असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

   त्यांनी तत्काळ चांगल्या रुग्णालयात तपासणी करून औषध उपचार करून घेण्याची सूचना केली. त्यानुसार कदम कुटुंबियांनी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये शशिकला कदम यांना गुरुवारी दाखल केले होते. मात्र शुक्रवारी उपचार सुरू असताना त्यांचा सकाळी 10.30 वाजता मृत्यू झाला. शशिकला कदम यांचा स्वाईन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी स्पष्ट केले.

  याबाबतची माहिती आरोग्य विभागाला मिळताच आशा गटप्रवर्तक सौ. सुषमा नीलेश चव्हाण, आशा स्वयंसेविका सौ. सविता वैभव आडके, सौ. माया मंगेश देवकर, आरोग्य सहाय्यक काशीद, आरोग्य सेवक फडतरे यांनी तत्काळ महागाव येथे धाव घेऊन घरोघरी जाऊन सर्दी, ताप, खोकला असणारे रुग्ण कोणी आहेत का याबाबत सर्वे केला. हे सर्वेक्षण शनिवारी सुरू राहणार असून संशयित रुग्ण आढळल्यास त्याला तत्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

श्रीकांत कारखानीस आज भेट देणार

चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस शनिवारी महागाव येथे भेट देणार आहेत. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता शशिकला कदम यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना औषधे उपलब्ध करून दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वाइन फ्लूची साथ असल्यास विशेषतः गरोदर मातांची जास्त काळजी घ्यावी लागते, त्याअनुषंगाने उद्या शनिवारी आमचे पथक महागाव येथे घरोघरी जाऊन गरोदर माता असतील तर त्यांची तपासणी करणार आहेत.

 

Related posts: