|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » इतुकेनि वीर केंविं होय?

इतुकेनि वीर केंविं होय? 

भीष्मक राजा रुक्मीला म्हणाला-पोरा! तुझ्या बुद्धीची कीव करावी. शत्रूला रणक्षेत्रापासून दूर नेऊन दुसऱयाकडून त्याचा वध करणे ही रणनीती आहे. त्यामुळे सैन्याची हानी न होता शत्रू मरतो. कृष्ण हा रणनीतिकुशल असल्याने त्याने मुचकुंदाकडून कालयवनाचा काटा काढला. तो जरासंधाला घाबरतो हेही काही खरे नव्हे. जरासंधाने प्रचंड सैन्यासह एक दोन वेळा नव्हे तर तब्बल अठरा वेळा मथुरेवर हल्ला केला आणि प्रत्येक वेळी कृष्णाने त्याचा पराभव करून त्याला पळवून लावले हे तू जाणतोस. कृष्णाने आपल्या प्रजाजनांच्या रक्षणासाठी समुद्रात वसविलेला भक्कम किल्ला सामान्य नव्हे. ती सोन्याची द्वारका नगरी आहे. त्या नगरीचे वैभव पाहून सगळे दिपून जातात.

भीष्मकाच्या उत्तराने रुक्मीचे काही समाधान झाले नाही. तो पुढे म्हणाला- केशिया मारिला तटू। बैल मारिला अरिष्टू । इतकियासाठीं वीर बाठू । केवीं सुभटू म्हणावा। कृष्णाने केशी नावाचे तट्टू मारले, अरिष्ट नावाचा बैल मारला. इतक्मयासाठी त्याला मोठा वीर म्हणावे काय? त्यावर भीष्मक म्हणाला-अरे! केशी राक्षस घोडय़ाच्या रूपात आला होता. त्याच्या मानेवरचे केस हलल्याबरोबर आकाशातील ढग विसकटत होते. त्याने जबडा एवढा वासला होता की जणू तो आकाशाला गिळून टाकतो की काय असा महाबलाढय़ राक्षस कृष्णाने बालपणीच लीलया मारला आणि तू म्हणतोस केशी नावाचे तट्टू मारले? धन्य आहे तुझ्या बुद्धीची!

अरिष्ट नावाचा बैल मारला असे तू हेटाळणीने म्हणतोस, पण तो अरिष्टासुर नावाचा महाबलाढय़ दैत्य होता. तो बैलाच्या रूपात कृष्णाला मारण्यासाठी आला. पाठीवरचे वशिंड पर्वतासारखे भासून मेघ त्याच्या मागे लपत होते. अशा प्रचंड बैलाला परीट ओले कपडे पायाने पिळतात तसे पिळून कृष्णाने ठार मारले. तो बैल म्हणजे सामान्य बैल नव्हता, मुला! मारिले वत्सासुर वासरूं । बकासुर तें पांखरूं ।  किरडूं मारिलें अघासुरू । इतुकेनि वीर केंविं होय  रुक्मी पुढे म्हणाला-कृष्णाने वत्सासुर नावाचे वासरू मारले, बकासुर नावाचे पाखरू मारले, अघासुर नावाचे किरडू मारले. यावरून तो वीर कसा म्हणावा?

त्यावर भीष्मक म्हणाला-अरे रुक्मी! वत्सासुर हा वासराच्या रूपात आलेला राक्षस होता. तो कपटी व महाबलाढय़ होता. कृष्ण गोपाळ आहे व त्याला वासरे आवडतात हे त्याला माहीत होते. म्हणूनच तो वासराचे रूप घेऊन वासरांच्या कळपात शिरला. कृष्णाने त्याला बरोबर ओळखले आणि त्याच्या मागच्या दोन पायांना धरून गरगर फिरवून कवठाच्या झाडावर आपटून त्यास मारले.  बकासुर हा दैत्य बगळय़ाच्या रूपात आला होता. त्याने आपल्या प्रचंड चोचीत पकडून बालकृष्णाला उचलले व गिळून टाकले. कृष्णाने आपल्या शरीरातील योगाग्नी पेटविला व शरीर तापविले. त्या बगळय़ाच्या पोटाचा दाह झाला व त्याने कृष्णाला ओकून टाकला. कृष्णाने दोन्ही हाताने त्याची चोच फाकून लव्हाळय़ाची काडी फाकावी तसे त्याला फाडले. आणि तू म्हणतोस बकासुर नावाचे पाखरू मारले?
Ad. देवदत्त परुळेकर

Related posts: