|Saturday, January 25, 2020
You are here: Home » क्रिडा » भारत अ चा मालिकाविजय

भारत अ चा मालिकाविजय 

दुसऱया कसोटीत 7 गडय़ांनी विजय, सामनावीर पांचाळ, अगरवाल, ईश्वरन, अनमोलप्रीतची अर्धशतके

वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन

सलामीवीर मयंक अगरवाल व प्रियंक पांचाळने झळकवलेल्या अर्धशतकांमुळे भारत अ संघाने विंडीज अ संघावर सात गडय़ांनी सहज विजय मिळवित दुसरी अनधिकृत कसोटी जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दोन्ही डावात अर्धशतके नोंदवणाऱया प्रियंक पांचाळला सामनावीराचा बहुमान मिळाला.

278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अगरवालने 134 चेंडूत 81 धावा जमविल्या तर पांचाळने 121 चेंडूत 68 धावा करीत विजयाचा पाया रचला. या दोघांनी पहिल्या गडय़ासाठी 150 धावांची भागीदारी केली. अभिमन्यू ईश्वरननेही नाबाद अर्धशतक (59) झळकवले तर अनमोलप्रीत सिंगने नाबाद 51 धावांचे योगदान दिल्याने भारत अ ने 79.1 षटकांत 3 बाद 278 धावा जमवित विजय साकार केला. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारत अ ने एकही बळी गमविला नव्हता. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताला विजयासाठी अद्याप 33 धावांची गरज होती. शेवटच्या चौथ्या दिवसाच्या खेळास भारत अ ने 3 बाद 185 या धावसंख्येवरून सुरुवात केली हाती.

तत्पूर्वी, ऑफस्पिनर कृष्णाप्पा गौतमने आपल्या फसव्या फिरकीवर विंडीज अ चे पाच बळी मिळविल्याने त्यांचा दुसरा डाव 149 धावांतच आटोपला. याशिवाय संदीप वॉरियरने 3 बळी घेत त्याला चांगली साथ दिली होती. संध्याकाळच्या सत्रात भारत अ ने 3 बळी 28 धावांत गमविले. पांचाळ-अगरवाल यांनी दमदार सुरुवात करून दिल्यानंतर दोघेही लागोपाठ बाद झाले. नंतर कर्णधार हनुमा विहारी देखील एक धाव काढून बाद झाला होता. विंडीजच्या दुसऱया डावात सुनील ऍम्ब्रोस (71) व जर्मेन ब्लॅकवुड (31) यांच्यामुळे संघाचे शतक फलकावर लागले. शिवम दुबेने ही जोडी फोडताना ब्लॅकवुडला बाद केले आणि नंतर गौतमने शेन डॉवरिच (5) व रेमन रीफर (0) यांना बाद केले. गुरुवारी भारत अ चा पहिला डाव 190 धावांत कोलमडला होता. दुबे (79) व प्रियंक पांचाळ (58) यांनी अर्धशतके झळकावत सहाव्या गडय़ासाठी 124 धावांची भागीदारी केल्यामुळेच संघाला दोनशेच्या जवळपास मजल मारता आली होती.  या मालिकेतील आणखी एक कसोटी बाकी आहे.

संक्षिप्त धावफलक : विंडीज अ प.डाव 318 (हॉज 65, ब्रूक्स 53, कॉर्नवाल नाबाद 56, मोहम्मद सिराज 3-63, वॉरियर 2-77, मकरंद मार्कंडे 3-79), भारत अ प.डाव सर्व बाद 190 (पांचाळ 58, दुबे 79, होल्डर 5-54, शेफर्ड 3-29, रीफर 2-42), विंडीज अ दु.डाव 149 (ऍम्ब्रिस 71, ब्लॅकवुड 31, के. गौतम 5-17, संदीप वॉरियर 3-43, सिराज व दुबे एकेक बळी), भारत अ दु.डाव 79.1 षटकांत 3 बाद 278 (पांचाळ 68, अगरवाल 81, ईश्वरन नाबाद 59, अनमोलप्रीत सिंग नाबाद 51, होल्डर 2-51, रीफर 1-57).

Related posts: