|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाकने दहशतवाद्यांवर कारवाई करावी!

पाकने दहशतवाद्यांवर कारवाई करावी! 

वॉशिंग्टन  / वृत्तसंस्था :

अमेरिकेने कलम 370 हटविण्याच्या भारताच्या निर्णयाचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. सूडाच्या भावनेतून भारताला आक्रमकता दाखविण्याऐवजी स्वतःच्या भूमीतील दहशतवाद्यांवर कारवाई करावी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरांना मदत करणे बंद करावे अशा शब्दांत अमेरिकेने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करावे असे अमेरिकेच्या हाउस फॉरेशन अफेयर्स कमिटी आणि सिनेट फॉरेन रिलेशन कमिटीने बुधवारी एका संयुक्त विधानाद्वारे भारताला सांगितले आहे.

लोकशाहीत पारदर्शकता आणि राजकीय सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. भारत सरकार जम्मू-काश्मीरमध्ये या मुद्यांवर लक्ष देईल अशी अपेक्षा आहे. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असल्याने सर्व नागरिकांना महत्त्व मिळत त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे त्याची जबाबदारी ठरत असल्याचे अमेरिकेने नमूद केले आहे.

इम्रान यांची सौदी युवराजांशी चर्चा

कलम 370 हटविण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याच कारणातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली आहे. भारताच्या ऐतिहासिक पावलानंतर इम्रान यांनी जगभरातील नेत्यांशी संपर्क साधला आहे. सोमवारी त्यांनी मलेशियाचे पंतप्रधान महातिर मुहम्मद आणि तुर्कस्तानचे अध्यक्ष रीसेप तैय्यप एर्दोगान यांच्याशी चर्चा केली होती. पाकचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी लवकरच चीन दौऱयावर जाण्याचे असल्याचे वृत्त आहे. भारताविरोधात संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत तक्रार करण्याची तयारी पाकिस्तानने चालविली आहे.

Related posts: