|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्थलांतरित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत द्या!

स्थलांतरित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत द्या! 

पालकमंत्री केसरकर यांचे अधिकाऱयांना आदेश

शहरी पंधरा, तर ग्रामीण दहा हजार

खचलेले डोंगर हटविण्याचे काम युद्धपातळीवर करा!

कुडाळ येथे पूर आढावा बैठक

प्रतिनिधी / कुडाळ:

पूरग्रस्त व डोंगर खचल्यामुळे स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना शहरी पंधरा हजार रु., तर ग्रामीण दहा हजार रुपयांची शासकीय मदत तातडीने 13 ऑगस्टपर्यंत देण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी सर्व संबंधित अधिकाऱयांना दिले.

खचलेले डोंगर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्या, असे आदेश बांधकाम, वनविभागाच्या अधिकाऱयांना त्यांनी दिले. आंबोली घाटाचे काम तात्काळ हाती घ्या. तोपर्यंत लहान वाहनांसाठी दिवसाची वाहतूक सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलीस व अधिकाऱयांना येथे पूरग्रस्त व पूर आढावा बैठकीत दिले.

येथील एमआयडीसी विश्रामगृहावर आज केसरकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱयांची बैठक आयोजित केली होती. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जि. प. सदस्य संजय पडते व अमरसेन सावंत, उपसभापती श्रेया परब तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दहा किलो धान्य देणार

ज्या लोकांच्या घरात पाणी गेले, स्थलांतरित केले, अशांना पाच किलो तांदूळ व पाच किलो गहू तातडीने देण्यात येणार आहेत. तसेच रॉकेल द्यावे, अशी मागणी आहे. मात्र, याबाबत पुरवठामंत्र्यांशी चर्चा केल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.

वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा

पूर तसेच वादळी वाऱयांमुळे दोडामार्ग, कुडाळ व अन्य तालुक्यात मोठय़ा प्रमाणात वीज खांब पडून वीज वाहिन्या तुटल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाला आहे, याची दखल केसरकर यांनी घेऊन अधीक्षक अभियंता पाटील यांना वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. लोखंडी शंभर, तर सिमेंटचे सातशे वीज खांब उपलब्ध असून अन्य साधनसामग्री असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्हय़ातील सर्व भागांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

आमदार वैभव नाईक यांनी वाडीवार वीजपुरवठा सुरळीत करा, याकडे लक्ष वेधले असता, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व होमगार्ड यांनी वीजपुरवठा कुठे बंद आहे, याची वीज वितरणला माहिती द्यावी, असे केसरकर यांनी सांगितले.

मदतीपासून कुणीही वंचित नको!

ज्या लोकांना स्थलांतरित केले आहे, अशांना शासकीय मदत देण्यात येत असून गाव-वाडीवार सर्व्हे करून पंचनामे करण्याचे आदेश कुडाळ व सावंतवाडी प्रांताधिकाऱयांना दिले. काही गावांमधील पूरस्थिती आता कमी झाली असून स्थानिक यंत्रणेला मदतीला घेऊन पंचनामे करा, अशा सूचना केसरकर यांनी दिल्या. सर्व पूरग्रस्तांचा पंचनामा केला जाईल, असे पांढरपट्टे यांनी सांगितले.

नुकसानीचे पंचनामे करा

दुकानासह अन्य नुकसान झालेय, त्याचेही पंचनामे करा. नुकसानीबाबत शासनाला अहवाल सादर करायचा आहे. सद्यस्थितीत भरपाई देण्याबाबत निर्णय झाला नसला, तरी व्यापाऱयांचे मोठे झालेले नुकसान दुर्लक्ष करण्यासारखे नाही, असे सांगत त्यांचाही दुसऱया टप्प्यात सर्व्हे करा, असे आदेश केसरकर यांनी दिले.

शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना

दोडामार्ग, सावंतवाडी कुडाळ, वेंगुर्ले, मालवणसह ज्या भागाला पुराचा तडाखा बसला. तेथील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. जेथे पुराचे पाणी गेले, त्या विहिरींचा पाणी उपसा करून औषधे टाका किंवा अन्य बाधित न झालेल्या विहिरीतून पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. जि. प. ‘सीईओ’ के. मंजुलक्ष्मी यांनी आपण याकामी जातीनिशी लक्ष देऊ, असे सांगितले. 

रस्ते-साकव दुरुस्ती तातडीने करा

ज्या भागातील रस्ते निकामी होऊन वाहतूक बंद झाली. त्या भागातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. गणेश चतुर्थीपूर्वी ही कामे मार्गी लावणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी सांगितले.

खचलेले डोंगर-दरडी तात्काळ काढा

ठिकठिकाणी डोंगर खचत असून शनिवारी सकाळपासून हायवे ठेकेदाराच्या मशिनरी व मनुष्यबळ घेऊन त्या हटवा. त्या ठेकेदारांना शासनाकडून बिल देण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगून उपस्थित बांधकामच्या अधिकाऱयांना तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. डोंगर खचलेल्या भागात कोणालाही राहायला देऊ नका. सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा, अशा सक्त सूचना महसूल व पोलीस यंत्रणेला दिल्या. 

समुद्र किनाऱयावर संरक्षक बंधारा

देवबागसह मालवण, देवगड, वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी भागात तुफानामुळे  धोका निर्माण झाला. तेथे दगड व वाळूची पोती टाकून संरक्षण होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना केसरकर यांनी दिल्या.

मसुरे-काळसे-चेंदवणöसरंबळकडे लक्ष द्या

नदीचे पाणी वाढल्यानंतर मसुरे, काळसे, चेंदवण, पावशी, सरंबळ, खोतजुवा, तोंडवलीसह जेथे मोठा धोका निर्माण होतो. तिथे विशेष लक्ष द्या. तेथे आवश्यक आपत्ती व्यवस्थापन सुविधा द्या. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आढावा बैठकीत सर्व विभागांनी कामाचा अहवाल द्यावा, असे केसरकर यांनी सांगितले. 

आंबोली घाटाचे काम तातडीने हाती

आंबोली घाटातील कोसळलेल्या दरडीच्या ठिकाणाहून छोटय़ा वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले. दरडीच्या ठिकाणी दिलीप बिल्डकॉन या महामार्ग ठेकेदाराच्या मशिनरीमार्फत काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधीला दिल्या. अवजड वाहतूक तळकटमार्गे वळविण्यात आली आहे. शनिवारी हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आंबोली घाटातून रात्रीची वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Related posts: