|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अफगाणिस्तानचा संबंध काश्मीरशी नको

अफगाणिस्तानचा संबंध काश्मीरशी नको 

वृत्तसंस्था/ काबूल

सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा संबंध अफगाणिस्तानमधील परिस्थितीशी जोडू नका, असा स्पष्ट सल्ला तालिबानने पाकिस्तानला दिला आहे. तालिबानच्या भरवंशावर असलेल्या पाकिस्तानला हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. काश्मीर प्रश्नावर शातंतेनेच तोडगा काढा, अशीही सूचना तालिबानने पाकला केल्याने त्याची कोंडी झाली आहे.

सध्या अमेरिकन अधिकाऱयांची तालिबानबरोबर चर्चा सुरू आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातून आपले सैन्य काढून घ्यायचे असल्याने तेथे स्थिर सरकारची स्थापना व्हावी, यासाठी अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे अमेरिकेचे अधिकारी तालिबानबरोबर चर्चा करून अमेरिकेच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानात हिंसाचार बळावू नये, असा प्रयत्न करीत आहेत.

भारताने गेल्या सोमवारी काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 व 35-अ काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तो पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. त्यामुळे अमेरिकेने मध्यस्थी करावी, असा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. यासाठी पाकिस्तान अफगाणिस्तानातील परिस्थितीचा वापर करून अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून सध्या अमेरिकेशी चर्चा करीत असलेल्या तालिबानने पाकिस्तानला हा परस्पर इशारा दिला आहे.

अफगाणिस्तानच्या सरकारने पंधरा सदस्यांचे शिष्टमंडळ त्या देशातील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी निर्माण केले आहे. हे शिष्टमंडळही अमेरिकेशी चर्चा करणार आहे. त्यात राजकीय नेते, मानवाधिकार कार्यकर्ते आणि अफगाणिस्तानातील अनेक वांशिक गटांचे नेते समाविष्ट आहेत. हे मंडळ लवकरच तालिबानबरोबर समोरासमोर चर्चा करणार आहे.

Related posts: