|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीला पर्यायी मार्गाची ‘बोलाचीच कढी’

आंबोलीला पर्यायी मार्गाची ‘बोलाचीच कढी’ 

दशकभर सुरू आहे चाचपणी : पर्याय अनेक, मात्र उत्तर सापडेना

संतोष सावंत/ सावंतवाडी

महाराष्ट्र-गोवा, कर्नाटक या तीन राज्यांसाठी महत्वाचा असलेल्या ब्रिटिशकालीन आंबोली घाटरस्त्याला जवळपास दीडशे वर्षे झाली आहेत. गेली नऊ वर्षे या घाट मार्गावर दरडी कोसळत असून या घाटमार्गाला पर्यायी मार्ग अद्याप निर्माण झालेला नाही. केसरी-फणसवडे पर्यायी मार्गाचा प्रस्ताव एक दशक प्रतीक्षेत आहे. तीन पालकमंत्र्यांचा कार्यकाळ उलटूनही ठोस काहीच झालेले नाही. या मार्गावरच तीन राज्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

आंबोली घाटमार्ग 15 किलोमीटरचा आहे. सावंतवाडी संस्थानकाळात ब्रिटिश राजवटीत 1870 मध्ये एका ब्रिटिश बांधकाम अधिकाऱयाने हा घाटमार्ग वाहतुकीस खुला केला होता. काळय़ा दगड कपारीतून काढलेला हा मार्ग दीडशे वर्षांहून अधिक काळ वाहतुकीचे ओझे पेलत आहे. मात्र, आता पर्यायी मार्गाशिवाय गत्यंतर उरलेले नाही. पावसाळी हंगामात या घाटातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

दरवर्षी पावसाळा आला की पर्यायी घाटमार्गाचा मुद्दा पुढे येतो. प्रत्येकवेळी वनजमिनीचा अडसर असल्याचे सांगत राज्यकर्ते आश्वासनांवर बोळवण करत आहेत. आधी नारायण राणे, अजित घोरपडे आणि आता दीपक केसरकर यांचीही पर्यायी केसरी-फणसवडेची टेप सुरुच आहे. घाटमार्गाची मृत्यूघंटा वाजू लागली तरी  पर्यायी केसरी-फणसवडेची फाईल काही पुढे सरकतांना दिसत नाही. माजी आमदार शिवराम दळवी यांनी 30 वर्षांपूर्वी मुंबईतून या घाटमाथ्यावर प्रथम हॉटेल व्यवसाय उभारला. आमदार असतांना त्यांनी पर्यायी मार्गाबाबत आवाज उठविला. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू वन आणि पर्यावरणमंत्री झाले. मात्र, जमिनीचा प्रश्न त्यांच्या हातूनही सुटला नाही. विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाही हा मुद्दा कधीच महत्वाचा वाटला नाही. राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे आंबोली घाटमार्गाला पर्याय मिळेनासा झाला आहे.

या मार्गावरून पावसाळी हंगामात पाच लाखाहून अधिक पर्यटक ये-जा करतात. दरदिवशी हजारो लहान-मोठी वाहने धावत आहेत. घाटमार्गाला विश्रांतीच नाही. त्यामुळे पर्यायी मार्ग हाच रामबाण उपाय ठरणार आहे.

घाटावर साडेचार कोटी खर्च

आंबोली घाटातील मुख्य दरड प्रथम 30 जून 2010 मध्ये कोसळली. त्यापूर्वी रस्ता खचून घाटमार्ग काहीकाळ बंद होता. त्यावेळी पर्यायी मार्गाचा विचार पुढे आला नाही. भलीमोठी दरड कोसळली तेव्हा मंत्री भास्कर जाधव यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यांनी पर्यायी मार्ग सूचवला होता. त्यानंतर दुसऱया वर्षी 11 जुलै 2011 रोजी पुन्हा दरड कोसळली. तेव्हापासून घाट असुरक्षित समजला जाऊ लागला. 2010 ते 2019 या नऊ वर्षात या मार्गाच्या सुरक्षिततेसाठी साडेचार कोटी रुपये खर्च घालण्यात आले. साडेतीन कोटी खर्च करून स्वित्झर्लंड येथील 1600 स्क्वेअर फूट भागात जाळी बसविण्यात आली. तसेच सिमेंटच्या भिंतीसाठी एक कोटी रुपये खर्च केले आहेत.

भूवैज्ञानिकांकडून सर्व्हे

नऊ वर्षांपूर्वी आंबोली घाटात दरडी पडू लागल्या तेव्हा मुंबई येथील
भूवैज्ञानिकांकडून घाटाचा सर्व्हे करण्यात आला. त्यांनी हा घाटमार्ग जुना झाला आहे. घाटातील काळे दगड आतून ढासळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे म्हटले होते. त्यांनी जाळय़ांचा पर्याय दिला होता. त्यानुसार शासनाने जाळी बसविली. पण आता घाटरस्त्यात दरड कोसळली. रस्ता खालून ढासळत चालला आहे.

केसरी-फणसवडेचा पर्याय, 70 लाख मंजूर

केसरी-फणसवडे पर्यायी मार्गासाठी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भूसंपादन प्रक्रिया दाणोली ते केसरी फणसवडे या 15 कि. मी. मार्गासाठी झाली आहे. मात्र, पुढे सहा ते सात कि. मी. अंतरावर फणसवडे ते चौकुळ नेनेवाडी मार्गात वनजमीन व महाराष्ट्र शासन जमिनीचा तिढा आहे. अडीच कि. मी अंतरात महाराष्ट्र शासन जमीन आहे. उर्वरित वनजमीन आहे. सहा कि. मी. अंतराचा प्रश्न शासन अखत्यारित अडकला आहे.

पारपोली व कलंबिस्त, शिरशिंगे पर्यायी मार्ग

धवडकीपासून सहय़ाद्री पट्टय़ात कलंबिस्त, शिरशिंगे, गोठवेवाडी, भडगाव, पाडगाव, गारगोटी ते धनगरवाडी असा मार्ग होऊ शकतो. दाणोली, पारपोली ते पूर्वीचा वस वा कलंबिस्त, वेर्ले, माधव पॉईंट, आंबोली असा तिसरा मार्ग होऊ शकतो. या तीन मार्गात फक्त दोन ते चार कि. मी. चा वनजमिनीचा प्रश्न आहे. घाटमार्ग धोकादायक होण्यास केबलचे जाळे जबाबदार आहे. या मार्गात जिओ केबल लाईनसाठी खोदाई झाली. पालकमंत्री केसरकर सांगतात की, केबल टाकणाऱया कंपनीची चौकशी करणार. चौकशीतून काय निष्पन्न होणार हे जनतेला माहीत आहे. मुख्य धबधब्याजवळील पुलाला वनखात्याने जाळी बसवली आहे. घाटाच्या वरच्या भागात प्रवाह अडविला जात नाही. वनखात्याने पूर्वीचे चर बुजवले आहेत. वाढता पाऊस, पाण्याचा वाढता प्रवाह घाट असुरक्षिततेचे कारण बनत आहे.

आंबोली घाटाला पर्यायी मार्ग अंतर

आंबोली – कुंभवडे, तळकट (दोडामार्ग) ते सावंतवाडी अंतर 60 कि. मी.

दाणोली, केसरी, फणसवडे, नेनेवाडी, आंबोली, सावंतवाडी 40 कि. मी.

नवीन पर्यायी मार्ग

सावंतवाडी, धवडकी, कलंबिस्त, शिरशिंगे, गोठवेवाडी ते भडगाव, पाडगाव, धनगरवाडी, गारगोटी 40 कि. मी.

सावंतवाडी दाणोली, पारपोली, आंबोली 25 कि. मी.

सावंतवाडी कलंबिस्त, वेर्ले, आंबोली 30 कि. मी.

Related posts: