|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शासनाच्या दुर्लक्षामुळेच महापूर : शरद पवार

शासनाच्या दुर्लक्षामुळेच महापूर : शरद पवार 

प्रतिनिधी / पलूस

हवामान खात्याने वेळोवेळी सूचना देऊनही सरकारने गांभीर्याने दखल न घेतल्याने महापूराचे संकट ओढवले आहे. महापूराने माणसे, जनावरे दगावली आहेत. अशाही परिस्थितीमध्ये शासन झोपले आहे. मात्र, आम्ही सत्तेत नसलो तरी सत्ताधाऱयांना हलवून जागे करण्याची धमक आमच्यामध्ये आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

    राष्ट्रवादीच्या खासदार व आमदारांचे एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना देण्याचे त्यांनी जाहीर केले. रामानंदनगर (ता. पलूस) येथे पूरग्रस्तांच्या भेटीप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. सुमनताई पाटील, रोहित पवार उपस्थित होते.

 पवार म्हणाले, 2005 साली महापूराचे संकट आले होते. मात्र, त्यावेळी संकटावर मात करण्याची धमक आमच्या सरकारमध्ये होती. तशी नागरिक व शेतकऱयांना तातडीने मदत केली. त्यामुळे संकटातून सावरु शकलो. गतवेळच्यापेक्षा यावेळची परिस्थिती अधिक गंभीर असताना सरकारने तातडीने आवश्यक ती मदत करणे गरजेचे होते.

 शासनाने वेळीच महापूराच्या सुरूवातीला दखल घेतली नाही. त्यामुळे माणसे, जनावरे दगावली. शेतीचे, घरांचे, छोटे,मोठे उद्योग,व्यवसाय यांचे नुकसान झाले. हवामान खात्याने अंदाज देऊनही अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला नाही. त्यामुळे महापूर आला. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सूचना केली होती. आपल्यावर आलेले संकटावर मात करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यास आमची साथ असेल, असे पवार म्हणाले.

कृष्णा नदीकाठावरील ऊस, हळद, द्राक्षे व अन्य पिके पाण्यात गेली. जमिनीची माती वाहून गेली. मुलाप्रमाणे सांभाळलेली जनावरे पाण्यात वाहून गेली. संकटाचे आभाळ कोसळलेल्या शेतकरी व नागरिकांना सावरण्यासाठी सरकारने सरसकट मदत जाहीर करण्यासाठी आम्ही भाग पाडू,  असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले, महापूराच्या मदतीला सरकारने पाच दिवस उशीर केला. तीही तोडकी मदत पडत आहे. पूर ओसरत आहेत. मात्र, इथून पुढे जास्त मदतीची गरज आहे.

आ. डॉ. विश्वजित कदम म्हणाले, महापूरातून बाहेर येण्यासाठी सरकारने वेळेत बोटी दिल्या नाहीत. त्यामुळे ब्रह्मनाळ येथील लोकांना प्राण गमवावे लागले. प्रशासनच आम्हाला आवाहन करतय की, आम्हाला मदत करा. आमच्या संस्था, कार्यकर्ते मदतीसाठी कार्यरत आहेत.  यावेळी महेंद्र आप्पा लाड, किरण लाड, जे. के. बापू जाधव, हेमंत पाटील, मारुती चव्हाण, पी. एस. माळी, सुरेखा लाड उपस्थित होत्या. 

 

Related posts: