|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » काश्मीरच्या विकासाला चालना मिळेल : गृहमंत्री

काश्मीरच्या विकासाला चालना मिळेल : गृहमंत्री 

खोऱयातून दहशतवादाचे उच्चाटन होणार :  राज्यसभेत बहुमत नसल्याने विधेयक मांडताना मनात होती भीती

वृत्तसंस्था/ चेन्नई 

 कलम 370 चा काश्मीर खोऱयाला कुठलाच लाभ झाला नसल्याने खूप पूर्वीच हटविणे  अपेक्षित हेते. कलम 370 हटविण्यात आल्यानंतर काश्मीरवर कोणता प्रभाव होईल याबद्दल गृहमंत्री म्हणून माझ्या मनात संभ्रम नव्हता. मात्र काश्मीरच्या विकासाला चालना मिळेल याबद्दल मला ठाम विश्वास होता. पण राज्यसभेत बहुमत नसल्याने गोंधळ होण्याची शक्यता पाहता संबंधित विधेयक मांडताना माझ्या मनात भीती होती. याच कारणामुळे आम्ही लोकसभेऐवजी राज्यसभेत हे विधेयक आधी मांडण्याचा निर्णय घेतल्याची कबुली गृहमंत्री अमित शाह यांनी चेन्नईत बोलताना दिली आहे.

राज्यसभा सभापती तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त एका कार्यक्रमाला शाह यांनी संबोधित केले आहे. राज्यसभेत आमचे पूर्ण बहुमत नसल्यानेच वरिष्ठ सभागृहात विधेयक सर्वप्रथम मांडण्याचा निर्णय घेतला होता. नायडू यांनी वरिष्ठ सभागृहाचे कामकाज अत्यंत कुशलतेने हाताळलं आणि पुढील काम सोपं झाल्याचे उद्गार गृहमंत्र्यांनी काढले आहेत.

विकासाच्या दिशेने वाटचाल

जम्मू-काश्मीरमधून आता दहशतवादाचे उच्चाटन होणार असून तो भाग विकासाच्या मार्गावर वाटचाल करणार आहे. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरला वेगळा असा लाभ झाला नसल्याचे गृहमंत्री म्हणाले. मागील सोमवारी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याची शिफारस केली होती. तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यासह राज्य पुनर्रचनेचे विधेयक मांडले होते.

मोदी-शाह हे कृष्ण-अर्जुनासमान

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. रजनीकांत यांनी या निर्णयाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे. मोदी आणि शाह हे कृष्ण-अर्जुनाच्या जोडीसमान असल्याचे उद्गारही त्यांनी काढले आहेत. काश्मीर विषयक सरकारचा निर्णय म्हणजे ‘मिशन काश्मीर’ आहे. अमित शाह हे कोण आहेत, हे लोक आता जाणतील असे म्हणत रजनीकांत यांनी गृहमंत्र्यांच्या संसदेतील भाषणाचे कौतुक केले आहे.

राहुल गांधी यांना प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाल्याच्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यात शांतता असून कलम 144 मध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. काश्मीरचे सर्वसामान्य कलम 370 हटविण्यात आल्याने आनंद व्यक्त करत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा ईदवेळी अत्यंत चांगले आणि शांततेचं वातावरण असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. कलम 370 हटविण्याचा निर्णय काँग्रेस नेते राहुल यांना आवडावा म्हणून घेतला गेलेला नाही. काश्मीरमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण करणाऱया लोकांपैकी राहुल गांधी एक असल्याची टीका केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. राहुल यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये लोक मरत असून सरकारने याबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली होती.

Related posts: