|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापुरानंतर महामारी

महापुरानंतर महामारी 

दोन हजारावर रूग्ण : महापुराचा मानसिक धक्का : पूर ओसरण्याचा वेग मंद : सगळीकडून मदतीचा ओघ

प्रतिनिधी/ सांगली

पावसाची उघडीप. कोयनेचा मर्यादित विसर्ग, अलमट्टीतून मोठा विसर्ग यामुळे कृष्णा-वारणेचा पूर ओसरत असला तरी महापुरा पाठोपाठ महामारी सुरू झाली आहे. शहरातील रूग्ण संख्या तिप्पट झाली आहे. पूरपट्टय़ात घाण पाणी, दुर्गंधी, मृत जनावरे, झुरळे, घुशी, उंदरे आणि काही ठिकाणी मगरीचे दर्शन यामुळे घबराट आहे. कृष्णेचा पसरलेला पूर पात्रात येत असल्याने पूर पातळी खाली जाण्यास विलंब होत आहे. दरम्यान, शासनाने स्वच्छता व उपचार यासाठी ‘नवी ऊर्जा’ मिशन सुरू केले आहे. महापूर मंदावला असला तरी श्वास गुदमरलेलाच आहे. सोलापूर, पंढरपूर, पुणे, वाई, सांगोला, मुंबईसह अनेक भागातून मदतीचा ओघ सुरू आहेत. मदत व बचाव कार्य सुरू आहे.

            महापुरात कोणाचे घर गेले, कोणाची शेती वाहून गेली तर कोण वाहून जाता जाता वाचले. महापुराच्या महाप्रलयाने मानसिक धक्का बसलेले, रक्तदाब आणि शुगर वाढलेल्या त्याच्याबरोबर  पायाला जखमा झालेल्या रूग्णांची संख्या तिपटीने वाढली आहे. थंडी ताप आणि जुलाबाच्या रूग्णांची संख्या तर शेकडय़ाने वाढली आहे. खासगीबरोबरच शासकीय रूग्णालयातील गर्दी वाढली आहे. सांगली सिव्हील हॉस्पिटलची ओपडी दोन हजारांवर पोहोचली असून सातशेहून अधिक रूग्ण ऍडमिट झालेले आहेत.

सांगलीतील आरोग्य यंत्रणेवरही वाढत्या रूग्ण संख्येचा कमालीचा ताण आला असून सांगलीसह लातूर, औरंगाबाद, पुणे, सोलापूर आदी भागातील दोनशेवर डॉक्टरांची पथके सांगली-मिरजेसह ग्रामीण भागात सक्रिय झाली आहेत. वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात तर पूरग्रस्त भागातील रूग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपिडीमध्ये तपासण्या, उपाचाराची आवश्यकता असल्यास ड्रेसिंग करण्यात आले आहेत. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दामाणी हायस्कूल आणि मराठा समाज येथे बाह्यरूग्ण तपासणी विभाग सुरू करण्यात आले आहेत. सांगली आणि मिरजेतील डॉक्टरांच्या दिमतीला अन्य जिह्यातील 140 डॉक्टरांचे पथक सांगलीत दाखल झाले आहे. प्रत्येक निवारा केंद्रामध्ये प्रत्येकी पाच डॉक्टरांना विभागून देण्यात आले आहे.

पूरग्रस्त रूग्णांसाठी चोवीस तास ओपीडी सुरू करण्यात आली असून दररोज सिव्हीलमध्ये ऍडमिट होणाऱया रूग्णांची संख्या दुपटीने वाढत सातशेवर पोहोचली आहे. दररोजची ओपीडी सहाशे झाली असून दिवसभरात शहरातील तपासणी केंद्रावर दोन हजारांवर पूरग्रस्त रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. 25 रूग्णांवर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

मानसिक धक्का आणि सर्पदंशाच्या  रूग्णांची संख्या लक्षणीय

यातील महापुराने उद्ध्वस्त झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या रूग्णांबरोबरच सर्पदंशाच्या रूग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. कोणाचा संसार पाण्यात गेला, कोणाचे कुटुंब महापुरात अडकले, तर कोणाची सुटका करताना जखमी झाल्याने अथवा महापुराचे पाणी पाहून शेकडो लोकांना मानसिक धक्का बसला आहे. स्वतंत्र वॉर्डमध्ये ऍडमिट केल्यानंतर हे रूग्ण विमनस्क आणि शून्यात पहात बसू लागल्याने त्यांना सामान्य वॉर्डमध्ये ऍडमिट करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे ते लवकर बरे होऊ लागले आहेत.

याशिवाय थंडी, ताप, जुलाब, रक्तदाब आणि शुगर, किरकोळ जखमा, पायात पू होणे, छाती भरलेली लहान मुले यांची संख्याही वाढली आहे. सिव्हील हॉस्पिटलचे साठ आणि अन्य जिह्यातून आलेले 140 असे दोनशे डॉक्टरांचे पथक चोवीस तास राबत आहेत.

जि.प.ची.नव्वद पथके

जिल्हा परिषदेने पूरग्रस्त भागातील उपचारासाठी नव्वद पथके नियुक्त केली आहेत. या पथकांनी आतापर्यंत आठ हजार रूग्णांवर उपचार करून विस्थापित छावण्यात सोडले आहे. 81 कर्मचारी पथके आणि जि. प.च्या 46 डॉक्टरांच्या मदतीसाठी अन्य जिह्यातील 90 डॉक्टरांना पाचारण केले आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 35 डॉक्टरांचे पथक आणि आयएमचे डॉक्टरही सेवा बजावत आहेत.

महापूर ओसरल्यानंतर रूग्ण संख्या वाढणार

महापुराचे पाणी पात्राच्या दिशेने सरकू लागल्याने पूरग्रस्तांना घरी परतण्याचे वेध लागले आहेत. पाण्याखाली गेलेले रस्ते खुले होऊ लागल्यानंतर दुर्गंधी सुटली आहे. लेप्टो, थंडी, ताप, पोटाचे विकार आणि बुरशीजनक आजारांमुळे त्रस्त रूग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. त्याची खबरदारी घेत आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आणि सिव्हील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुबोध उगाणे यांनी दिली.