|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापुराचा दीड लाख एकर शेतीला फटका

महापुराचा दीड लाख एकर शेतीला फटका 

हजारो कोटींचे नुकसान : आजपासून पंचनामे सुरू : शिराळा, पलूस तालुक्याला सर्वाधिक दणका : बळीराजा कोलमडला

प्रतिनिधी/ सांगली

महापुरामूळे सहा तालुक्यातील सुमारे दीड लाख एकर शेतीला फटका बसला आहे. यामुळे शेतकऱयांचे हजारो कोटींचे नुकसान झाले असून आजपासून पंचनामे करण्यास सुरवात करण्यात आली आहे. ज्या भागातील पाणी कमी झाले त्या भागातील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल. पण, यामुळे नदीकाठाचा शेतकरी कोलमडून पडणार आहे. 

यावेळी महापुराने सर्वच तज्ञांचे अंदाज चुकवले. 2005 पेक्षा महाभयंकर प्रलय झाला. वाळवा, शिराळा, पलूस, मिरज या तालुक्यासह कडेगाव आणि तासगाव तालुक्यालाही त्याची झळ बसली आहे. चार तालुक्यांतील बहुतांशी गावांना महापुराने वेढा टाकला. घरे पाण्याखाली गेली, जनावरे वाहून गेली. शेती महापुरात बुडाली. आठ ते दहा दिवसांपासून ऊस, केळी, भाजीपाला यासह नगदी पिके पाण्यात बुडालीच. तर अनेक गावांतील शेती वाहून गेली आहे. कृषी विभागाने केलेल्या नजर पाहणीत 54 हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील 19 हजार हेक्टर,पलूसमध्ये 14 हजार आणि मिरज तालुक्यात 12 हजार हेक्टर शेती पाण्याखाली बुडाली आहे. वाळवा तालुक्यात सात हजार 800 हेक्टरचे नुकसान असून अन्य तालुक्यात सरासरी तीनशे ते चारशे हेक्टर फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हजारो कोटीचा फटका

 सुमारे दीड लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याने हजारो कोटींचा फटका बसला असून बळीराजाचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्यक्षात पंचनामे केल्यानंतर शेतमालाच्या नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल. त्यासाठी शासनाने जाहीर केलेली मदत तोकडी पडणार असल्याने शेतकरी पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

जिह्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा 

जिह्यात महापुराचा प्रलय झाल्याने हजारो कुटुंबे आणि व्यापारी, शेतकरी, उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे जिह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे मोडून पडलेला शेतकरी आणि अन्य घटकांना पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने भरीव मदतीची गरज आहे. सांगली कोल्हापूरचा महापूर हा राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून त्यादृष्टीने मदत करण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी निवेदन दिले आहे. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्त्यांनीही या मागणीचे निवेदन दिले आहे.

शेती नुकसान भरपाई निकषापलिकडे जावून द्या : बाबर

महापुरामुळे जिह्यातील झालेल्या शेतीचे नुकसान अपरिमित आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने निकषापलिकडे जाऊन धोरण ठरवण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि नेत्यांबरोबर चर्चा करून लवकरच शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती सुहास बाबर यांनी दिली.

Related posts: