|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पूरग्रस्तांसाठी तब्बल 5 हजार सॅग्नोटरी नॅपकीन रवाना

पूरग्रस्तांसाठी तब्बल 5 हजार सॅग्नोटरी नॅपकीन रवाना 

रत्नागिरीतील आनंदी सोशल फौंडेशनचा आगळा उपक्रम

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतकार्य सुरू आहे. रत्नागिरी जिल्हय़ातूनही मोठा मदतीचा ओघ सुरू असून शेकडो लोकांनी आपापल्या परीने मदतकार्य केले. महिलावर्गांना लागणाऱया सॅनेटरी नॅपकीनची मोठी गरज होती आणि ही गरज लक्षात घेवूनच आनंदी सोशल फौंडेशन यांच्या सहकार्याने रत्नागिरीतील विविध घटकांमार्फत तब्बल 5 हजार सॅनेटरी नॅपकीन रविवारी पाठवण्यात आले. आनंदी वुमन्स केअरकडे नॅपकीनची आणखीन मागणी होत असल्याची माहिती फौंडेशनच्या संचालिका पल्लवी पटवर्धन यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

ग्राहक संघ, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बीकॉम आणि बीएमएस तसेच राष्ट्र सेवा समितीच्या विद्यार्थ्यांनी नॅपकीनसाठी आनंदी फौंडेशनशी संपर्क केला.  त्यानंतर नॅपकीन्स आनंदी वुमन्स केअर संस्थेकडून बनवून घेतले. सगळय़ांच्या पुढाकारानंतर तब्बल 5 हजार सॅनेटरी नॅपकीन्स सांगली, कोल्हापूर येथे रवाना झाले असून आनंदी सोशल फौंडेशनच्या या उपक्रमाला नागरिकांचा विशेषत: विद्यार्थ्यांतर्फे चांगला प्रतिसाद दिला जात आहे.

पूरग्रस्तांसाठी रत्नागिरी जिल्हय़ातून अन्नधान्य, कपडे, खाऊ, पाणी यांचा मोठा पुरवठा करण्यात आला असून अशी मदत इतर जिल्हय़ातून सुरू आहे. कमतरता आहे ती ‘सॅनेटरी नॅपकीन्स’ची. सॅनेटरी नॅपकीनची मोठी आवश्यकता लक्षात घेवून रत्नागिरीतील आनंदी सोशल फौंडेशनने पुढाकार घेतला. त्यानंतर अनेकांना आवाहन केल्यानंतर तीन-चार दिवसात अनेकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. हे नॅपकीन कोणत्याही दुकानात विकत न घेता आनंदी वुमन्स केअरमधूनच बनवून घेण्यात आले. विशेष म्हणजे नॅपकीन्समध्ये कोणतेही केमिकल नाही. आरोग्यदायी नॅपकीन्स बनवण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षापासून संचालिका पल्लवी पटवर्धन प्रयत्न करीत आहेत.

पूरग्रस्तांना तब्बल 5 हजार सॅनेटरी नॅपकीन्सचा पुरवठा अवघ्या 3 दिवसात करण्यात आला. या संस्थेने दिवस-रात्र काम केले. अनेकांच्या मागणीमुळे 5 हजार सॅनेटरी नॅपकीन्स पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आल्या असून अद्यापही नागरिकांकडून मागणी होत आहे. कोल्हापूर, सांगलीत एकही मेडिकल सुरू नाही. घराचाही पत्ता नाही. अशावेळी सॅनेटरी नॅपकीन्सची ही गरज ओळखून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गोगटे जोगळेकरच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

‘पॅडमॅन’ या अक्षयकुमारच्या चित्रपटानंतर समाजात विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये चांगली जनजागृती झाल्याचे समोर आले आहे. परिणामी रत्नागिरीतून पाठवण्यात आलेल्या सॅनेटरी नॅपकीन्सच्या पुरवठय़ात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मोठा पुढाकार आहे.  

Related posts: