|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रत्नागिरीचे आमदार सामंत ठरले सांगलीकरांसाठी देवदूत!

रत्नागिरीचे आमदार सामंत ठरले सांगलीकरांसाठी देवदूत! 

एका एसएमएसने वाचला 350 लोकांचा जीव

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सांगलीतील मौजे डिग्रजमधील पूरस्थितीत अडकलेले 350 लोक तासन्तास याच भागातील यशवंतराव विद्यालयात मदतीची वाट पहात होते. मात्र प्रशासकीय यंत्रणा येथेच पोहोचलीच नाही. यावेळी पुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या कोल्हापुरातील नातेवाईकाने एसएमएसद्वारे रत्नागिरीच्या श्रीमती बावडेकर यांना परिस्थितीची कल्पना दिली. तोच एसएमएस त्यांनी आमदार उदय सामंत यांना पाठवला. त्यानंतर तेथील भयावह परिस्थिती लक्षात घेऊन सामंत यांनी तत्काळ आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि काही तासांतच तब्बल 350 लोकांना संकटातून बाहेर काढण्यात यश आले.       

  पूरपरिस्थितीत सांगलीतील मौजे डिग्रजमधील नागरिक अडकल्याचा एसएमएस गुरूवारी आला तेव्हा आमदार उदय सामंत हे मुंबईत एका बैठकीत व्यस्त होते. मात्र तरीही आपत्तीतील नागरिकांची सुटका करण्याच्या उद्देशाने आमदार उदय सामंत यांनी त्वरेने आपले प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत खडतरे यांना संबंधित सर्व विभागांना यासंदर्भात संपर्क करण्यास सांगितले. आमदार सामंतांचे तत्कालीन मंत्री असतानाचे खासगी सचिव म्हणून काम केलेले गोपीचंद कदम सध्या सांगलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर आहेत. त्यांनी आमदार उदय सामंत यांचा कॉल जाताच सर्वतोपरी सहकार्यासाठी पाऊल उचलले तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांच्याशीही सामंत यांनी संपर्क केला. इथवरही न थांबता पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक यावळकर यांच्याशाही चर्चा केली आणि व्यवस्थापनाच्या सगळ्य़ा यंत्रणा 350 लोकांना बाहेर काढण्यासाठी कामाला लागल्या. या सर्वांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. लोकप्रतिनिधींना समाजसेवेसाठी मतदार संघ ही एकच चौकट नसते, हे आमदार उदय सामंत यांनी आपल्या कृतीवरून महाराष्ट्रातील सर्व जनतेला दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे काही नेतेमंडळी पाहणी करण्याच्या नावाने पुराच्या पाण्यात फोटो संकलन करताना दिसत आहेत. याउलट आमदार उदय सामंत यांनी घटनास्थळी न जाता फोनवरून 350 लोकांची संकटातून सुटका केली, ही बाब आदर्शवतच ठरली आहे.

आमदार सामंतांचे सांगलीवासीयांनी मानले आभार

 रत्नागिरीच्या आमदार उदय सामंत यांनी माणुसकीच्या जाणीवेतून आपली सर्व कामे बाजूला ठेवून 350 लोकांचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावल्याने त्यांचे सांगलीवासीयांनी आभार मानले आहेत.

Related posts: