|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मेळा पांचां पंचकांचा

मेळा पांचां पंचकांचा 

भीष्मक रुक्मीला पुढे म्हणाले-रुक्मी! अविचाराने संकटे येतात. सर्वांचा नाश होतो. आपण धर्म शास्त्र ज्योतिष मानणारे आहोत. निदान पत्रिका तरी पाहू दे. कर्मकांडीचे वेदपाठक । बोलावूनि ज्योतिषी गणक ।  वाग्निश्चयाचे वाग्जाळिक ।  शास्त्रें शाब्दिक सोडिलीं । । भीष्मक राजाने विद्वान वेदवेत्या, भविष्य जाणणाऱया ब्राह्मणांना बोलावून पत्रिका पाहण्यास सांगितले. ते गणित करू लागले. मेळा पांचां पंचकांचा । शब्दनिश्चयो तेणें साचा ।  साभिमान गर्जे वाचा । सोयरा आमुचा शिशुपाळ  रुक्मी गर्वाने म्हणाला-जरासंध, वक्रदंत, शाल्व, पौंड्रक व स्वतः मी एवढे पाच बलाढय़ मित्र शिशुपालाचे रक्षण करायला समर्थ असताना कृष्ण त्याला मारेल हे अशक्मय आहे. आमच्या मनगटाच्या बळावर आम्ही आकाशवाणी खोटी पाडू. देवापेक्षा आमच्या पराक्रमावर आमचा विश्वास आहे. माझा निश्चय अटळ आहे. साक्षात यम जरी आडवा आला तरी त्याला मारून मी रुक्मिणी शिशुपालाला देणारच.

रुक्मिणी काया मनें वाचा। निश्चय केला श्रीकृष्णाचा। बाहेर वाग्निश्चय शब्दाचा। शिशुपाळासी रुक्मिया रुक्मिणीने काया वाचा मनाने श्रीकृष्णालाच आपला वर म्हणून निश्चय पूर्वक वरले होते. तर इकडे रुक्मीने शिशुपालाशीच तिचा विवाह करायचा निश्चय केला होता. लग्नपत्रिका पाहतां डोळां । एक नाडी जी शिशुपाळा । कृष्ण नेईल भीमकबाळा । यासी अवकळा वरील  कर्मकांड जाणणारे, वेदपाठक, ज्योतिषी, गणक यांनी पत्रिका पाहून स्पष्ट अभिप्राय दिला-शिशुपाल व रुक्मिणी यांची पत्रिका मुळीच जुळत नाही. एकनाड येते. हा विवाह होणार नाही. कृष्ण रुक्मिणीला घेऊन जाईल. हे ऐकल्यावर रुक्मी संतापला व वाटेल ते बोलू लागला-दक्षिणेच्या लोभाने, पोट जाळण्यासाठी भविष्य सांगणाऱया या भटजीवर विश्वास काय म्हणून ठेवावा? जास्त दक्षिणा दिली की पत्रिका जमते म्हणून सांगतील. वीर पुरुषाला ग्रह पीडा देत नाहीत. तुमच्या त्या नवग्रहांच्या लंकापती रावणाने पायऱया केल्या होत्या, त्या ग्रहांची थोरवी मला सांगू नका. या ज्योतिषांचा मोठेपणाही मला सांगू नका. आम्ही ही शास्त्र वाचले आहे. सांगू कां यांची लायकी काय आहे?

गणिका गणकौ समानधर्मौ निजपंचांग निदर्शकावुभौ । जनमानस मोहकारिणौतौ विधिना वित्तहरौ विनिर्मितौ  वेश्या व ज्योतिषी सारखेच. एक पंचांग दाखवितो तर दुसरी पंच अंगे उघडी करून दाखविते. दोघेही माणसांच्या मनावर मोहिनी घालतात. ब्रह्मदेवाने त्यांना लोकांचे धन हरण करण्यासाठी निर्मिले आहे. ही तुमच्या पोटभरू ज्योतिषांची योग्यता! त्यांचे भविष्य मला सांगू नका. माझा माझ्या पराक्रमावर विश्वास आहे. या कुंडलीतील ग्रहांवर नाही. बाबा, तुम्ही आता वृद्ध झाला आहात. तुमची बुद्धी चळलेली आहे. तुम्ही हरी, हरी करीत स्वस्थ बसा व मुकाटय़ाने कन्यादान करा. नाही तर मी तुम्हाला कारागृहात टाकीन.

रुक्मीचे संतप्त बोल ऐकून भीष्मकाला वाईट वाटले. त्याचा नाईलाज झाला. बलाढय़ व दुष्ट पुत्रापुढे त्याचे काही चालले नाही.

Ad. देवदत्त परुळेकर

Related posts: