|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोलगाव येथून बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

कोलगाव येथून बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला 

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज

सावंतवाडी:

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव-वाघडोळवाडी येथून सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या शेखर नारायण परब (45) यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी कोलगाव काजरकोंड येथील ओहोळातील झुडपात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. रविवारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

शेखर परब हे पाच ऑगस्टला रात्री घरातून बाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरातील नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता.

गेले आठ दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. परब यांच्या घराच्या मागील ओहोळालाही पूर आला होता. शेखर यांना रात्रीच्यावेळी ओहोळावर शौचास जाण्याची सवय होती. त्यामुळे शौचास गेले असता तोल जाऊन ओहोळात पडून वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. सहा दिवसांनी शेखर यांचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह कोलगाव-काजरकोंड ओहोळात झुडपात आढळून आला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, सहाय्यक पोलीस
उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत, पोलीस कर्मचारी दीपक सुतार, डी. व्ही. नाईक यांनी पंचनामा केला. यावेळी कोलगाव ग्रामस्थ चंदन धुरी, अनिल नाईक, राजू वाळके, बाबा राऊळ, ल. म. सावंत, संजय परब, सचिन राणे व नातेवाईक उपस्थित होते.  शेखर अविवाहित होते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहिणी, पुतणे असा परिवार आहे. शहरातील गांधी चौक रिक्षा स्टॅण्ड येथील रिक्षाचालक चंदा परब यांचे भाऊ होत.