|Saturday, December 14, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्स आणणार सर्वाधिक विदेशी गुंतवणूक

रिलायन्स आणणार सर्वाधिक विदेशी गुंतवणूक 

अराम्कोकडून सुमारे 5,32,466 कोटींची खरेदी : आरआयएलच्या 42 व्या वार्षिक सभेत मुकेश अंबानींची घोषणा

वृत्तसंस्था/ मुंबई

आतापर्यंत भारताला सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळाल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या ऑइल टू केमिकल उद्योगातील 20 टक्के भागभांडवल सौदी अराम्के खरेदी करणार असून, त्याचे एकूण मूल्य 75 अब्ज डॉलर (सुमारे 5,32,466 कोटी) इतके आहे.

सौदी अराम्कोशी झालेल्या करारामुळे भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. या करारात, रिलायन्सच्या ऑईल टू केमिकल उद्योगातील 20 टक्के भागभांडवल अराम्को खरेदी करणार आहे. 2019 या आर्थिक वर्षात रिलायन्सला या उद्योगातून 5.7 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी ही तात्पुरती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अराम्कोकडून रिलायन्सच्या जामनगर येथील रिफायनरीला दररोज 5 लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येणार आहे. या रिफायनरीची क्षमता प्रतिदिन 1.4 दशलक्ष बॅरल इतकी आहे. ती 2030 पर्यंत वाढवून 2 दशलक्ष बॅरल करण्याचे नियोजित केले आहे.

वाढती आवश्यकता

देशात पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियमजन्य पदार्थांची आवश्यकता मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. हे लक्षात घेऊन रिलयान्सनेही आपल्या तेल उद्योगाचा विस्तार करण्याची योजना तयार केली आहे. आता विदेशी कंपन्यांशी सहकार्य करून हा व्यवसाय वाढविला जाणार आहे.

तेल देण्याचे आश्वासन

सौदी अरेबिया हा तेल उत्पादनाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. भारताने इराणकडून होणारी तेलआयात थांबविल्याने सौदी अरेबियाने भारताला अधिक तेल देण्याचे आश्वासन दिले आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून रिलायन्स आणि अराम्को यांच्यातील कराराकडे पाहिले जात आहे.

Related posts: