|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मोकळा श्वास ; समोर अंधार

मोकळा श्वास ; समोर अंधार 

महापुरातील मृतांची संख्या 23 वर : घरदार, शेती, उद्योग उद्ध्वस्त : नुकसानीच्या आकडय़ांचा अंदाज बांधणे झाले कठीण

प्रतिनिधी/ सांगली

कृष्णा-वारणेसह सांगली-कोल्हापुरातील नद्यांनी रौद्ररूप धारण करून घातलेला महापुराचा वेढा सैलावला आहे. तथापि, संसार, घरदार, शेती, व्यापार, उद्योग उद्ध्वस्त झाल्याने अनेकांच्या पुढे काळाकुट्ट अंधार आहे. पूर ओसरलेल्या भागातील माणसे पाण्यात डुबलेला संसार बघून आक्रोश करत आहेत. नुकसानीचे आकडे थरकाप उडवत आहेत. पूर हटलेल्या भागातून नव्याने तीन मृतदेह मिळाल्याने पूर बळीची संख्या 23 झाली आहे. मदत, बचाव कार्य व स्वच्छता मोहीम सुरू असली आणि अनेक स्वयंसेवी व धार्मिक संघटना त्यात उतरल्या असल्या तरी कचऱयांचे ढीग, मृत जनावरे, दुर्गंधी आणि पुढे काय हा अंधार सर्वांना पोखरतो आहे.

कृष्णा-वारणा नद्यांनी रौद्ररूप धारण करत सांगलीसह कृष्णाकाठ आणि वारणाकाठी गेले सात दिवस तांडव केले. आता महापूर उतरू लागला. रस्ते, पूल मोकळे होऊ लागले. आणि थोडीफार वाहतूक सुरू झाली. त्यामुळे मोकळा श्वास मिळाला. पण, सोमवारी सकाळपासून अनेक भागातून आक्रोश सुरू आहे. दुकान पूर्ण उद्ध्वस्त झाले, फर्निचर कुजले, घरातील, दुकानातील धान्य कुजले, मोबाईल शॉपी बुडाली, भिंत पडली, बसस्थानक परिसरातील वेध डायग्नोस्टीक सेंटरमधील सिटी स्कॅन, एम. आर. आय. आणि अशीच अनेक कोटींची मशिनरी पाण्यात बुडली. बेकऱया, खानावळी, बार, सराफी दुकाने, बँक शाखा लॉकर, धान्य बाजार, कापडपेठ, गणपती पेठ, कोल्हापूर रोड, गावभाग, फौजदार गल्ली, राजवाडा सारे पाण्यात होते. पोस्ट, महापालिका, पोलीस ठाणे व पोलीस वसाहत, जेल, दोन्ही नाटय़गृहे, नगर वाचनालय, शाळा-महाविद्यालये त्यांची गंथालये पाण्यात होती. पाणी हटताच हे नुकसान बघून शहरात आणि जिह्यातही आक्रोश सुरू झाला आहे.

दरम्यान, बचत आणि मदत कार्याला वेग आला असला तरी महापुराचे बळी वाढतच आहेत. घाडगे-पाटील शोरूम समोर, कृष्णा कॉम्प्लेक्स आणि वखारभागात येथे आज तीन मृतदेह सापडले. शहरात आणि जिह्यात भटकी कुत्री, डुकरे, गायी, खेचरे यांचे मृतदेह दिसत आहेत. ग्रामीण भागात शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली असून पशुधन मोठय़ा प्रमाणात बळी गेलेले आहे. शेतात बांधलेल्या गायी व म्हशी व शेळ्या पुरात बुडून दावणीलाच ठार झालेल्या आहेत. कित्येक शेतकऱयांची जनावरे वाहून गेलेली आहेत.

ग्रामीण भागात बुडालेली घरे पडली आहेत. फार्म हाऊसचे, छप्परांचे मोठे नुकसान झालेले आहे. सांगली अर्धी पाण्यात असल्यामुळे अनेक अपार्टमेंटमधील दुचाकी, चारचाकी गाडय़ा रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाडय़ा, ट्रक यांची वाट लागली आहे. गणपती पेठ, कापडपेठ, सराफकट्टा आणि डिपार्टमेंटल स्टोअर्स येथील नुकसान अंगावर काटा आणणारे आहे. धान्य, साखर, डाळीची मिठा, पिठाची शेकडो पोती भिजली आहेत. दवाखान्यातून महागडी मशिनरी खराब झालेली आहे. मोबाईल शॉपी, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने यांचेही अतोनात नुकसान झालेले आहे. समोर सगळा अंधार दिसतो आहे.

दरम्यान, शहरात आणि जिलह्यात एकीकडे मदत आणि बचाव कार्य तर दुसरीकडे अफवा आणि राजकीय टिंगलबाजी यांना उत आला आहे. सोयश मीडियावरून काहींना लक्ष्य करून काही मंडळी मोहीमा चालवू लागलेले आहेत. पण, सामान्य माणसांना महापुराचा महाधक्का बसला असल्याने तो विंवचनेत आहे. कृष्णेने पूर पातळी 50च्या आत आली असून कृष्णा पात्रात उतरायच्या दिशेने वाटचाल करत असली तरी मारूती चौक, गावभाग आणि स्टेशन चौक, राजवाडा चौक येथे अद्यापही पाणी आहे. बीव्हीजी ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संत निरंकारी सांप्रदाय, वारकरी सांप्रदाय, विशाल पाटील मित्र मंडळ, महापालिकेची टीम, ग्रामीण भागात जि. प. ची आरोग्य यंत्रणा स्वच्छता मोहिमेत उतरली आहेत. पूरपट्टय़ात आणि पूर हटलेल्या भागात वीज, पाणी, नेटवर्क अजूनही बंदच आहे.जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असले आणि रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक यांना प्रारंभ झाला असला तरी या महासंकटाचा दणका मोठा आहे. अवघा कृष्णा-वारणाकाठ चांगलाच धास्तावला आहे.

 

Related posts: