|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कृष्णेवरील नऊ पुलाचे करणार स्ट्रक्चरल ऑडीट

कृष्णेवरील नऊ पुलाचे करणार स्ट्रक्चरल ऑडीट 

दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय : लवकरच तज्ञांमार्फत होणार कार्यवाही

प्रतिनिधी/ सांगली

पूल कोसळून होणारी वित्त आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृष्णा नदीवरील सर्व पुलांचे तज्ञांमार्फत स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार आहे. नदीवर कराड त म्हैसाळपर्यंत नऊ पूल आहेत. याच्या ऑडीटचे काम लवकरच सुरू केले जाणार असून याबाबतचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निकृष्ट बांधकाम आणि 50 वर्षापूर्वी बांधलेले पूल कोसळण्याच्या घटना राज्यात घडत आहेत. गेल्या तीन वर्षापूर्वी रायगड जिह्यातील सावित्री नदीवरील पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेला होता. यामध्ये वित्त आणि जीवितहानी झाली होती. यानंतर मुंबईमध्येही एक पूल पडून दुर्घटना घडली होती. तर गेल्याच महिन्यात वाहतुकीला बंद केलेला कराड येथील पूल कोसळला होता.

या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिह्यात असलेल्या कृष्णा नदीवरील सर्व पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णा नदीवर कराड ते म्हैसाळपर्यंत नऊ पूल आहेत. तर सहा बंधारे आहेत. बहे, ताकारी, भिलवडी, सांगली नवीन बायपास, आयर्विन, अंकली जुना आणि नवीन तसेच कृष्णाघाट मिरज या पुलांचा समावेश आहे. यातील सांगली आयर्विन, भिलवडी, जुना अंकली, ताकारी हे पूल 50 वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत.

आयर्विन आणि अंकली इंग्रजांनी हे पूल बांधले आहेत. शंभर वर्षे झाली असून सध्या आयर्विनवरून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर अंकली नवा, सांगली बायपास, हे पूल नवीन आहेत. असे असले तरी या सर्व पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पूर ओसरताच पुलाच्या ऑडीटचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील तज्ञ अधिकाऱयांची नेमणूक केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर तो शासनाला पाठविण्यात येणार आहे.

ऑडीटमध्ये जे पूल धोकादायक असतील त्या पुलावरील वाहतूक बंद करण्याचीही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कृष्णेवरील पुलाबरोबरच वारणा नदी, तसेच जिह्यातील इतर राज्य, जिल्हा व अन्य मार्गावरील पुलाचेही ऑडीट करण्याची गरज आहे.

Related posts: