|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगली, कोल्हापूर मधील पूरग्रस्तांचे महिनाभरात पुनर्वसन

सांगली, कोल्हापूर मधील पूरग्रस्तांचे महिनाभरात पुनर्वसन 

पुनर्वसन व मदतकार्य मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

प्रतिनिधी/ सोलापूर

सांगली आणि कोल्हापूर जिह्यात आलेल्या पूरामुळे लोक संकटात असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार कटीबध्द असून, या दोन्ही जिह्यातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन महिनाभरात करण्यात येईल, अशी माहिती सहकार व पुनर्वसन व मदतकार्य खात्याचे मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

 सांगली आणि कोल्हापूर जिह्यात नदीला पूर आल्यामुळे पूरग्रस्त भागात लोकांचे आतोनात हाल होत असून, या अनुषंगाने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने   सहकारमंत्री देशमुख यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम सोमवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहकारमंत्री देशमुख यांनी सांगली आणि कोल्हापूर जिह्यातील परिस्थितीची पाहणी केली असून, तेथील लोकांना शासनाच्या वतीने मदत करण्यात येत आहे.

  आपण संपूर्ण पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे. राज्यशासनाच्या वतीने बांधित लोकांना तात्काळ 5 हजार रोख आणि पंचनामे करुन नंतर 5 हजार रुपये देण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 देशमुख म्हणाले, सांगली जिह्यात वर्षभर पडणाऱया पाऊसापेक्षा दुप्पट पाऊस तीन दिवसात पडल्याने सांगली शहरासह अनेक गावात पाणी शिरल्याने 25 हजारापेक्षा जास्त कुटुंबे पाण्यात अडकली होती. त्या कुटुंबांना 92 टीमच्या पथकाने सुरक्षित स्थळी हालविले असून, 35 हजार जनावरे वाचविली आहेत. पुराचा तडाखा खूप मोठा असल्याने अनेक जनावरे वाहून गेली. काही लोकांचा मृत्यू झाला तर अनेक नागरिक पाण्यात वाहून गेले. पूराचा फटका बसलेल्या सर्व कुटुंबाचे लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असून शासन नागरिकांच्या पाठीशी आहे, असेही यावेळी सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.

 कोल्हापूरसह सांगली जिह्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले असून सांगली जिह्यातील 450 कि.मी.चे रस्ते खराब झाले आहेत. पुनर्वसनाचे काम हाती घेतल्यानंतर हे रस्ते पुन्हा दुरुस्त करण्यात येणार आहेत.

सांगली जिह्यातील हरिपूर गावाचे घेतले पालकतत्व

सांगली जिह्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने पूर आला असल्याने सांगली शहरासह जिह्यातील अनेक गावात पाणी शिरल्यामुळे बाधित कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिह्याने हरिपूर या गावाचे पालकतत्व स्वीकारले आहे. या गावांना मदतीसाठी सोलापुरातील सोलापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स, सोलापूर यंत्रमाग संघ, व विकासनगर येथील भाजप कार्यालय येथे विविध साहित्य जमा करावे, असे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले आहे. 

विविध संघटनानी पूरग्रस्तांना मदत करावी

सांगली येथे पूरग्रस्त भागांना भेटी दिल्यावर तेथील परिस्थिती लक्षात आली असून त्यांना ब्रशपासून सर्व गोष्टीच्या मदतीचे गरज आहे. त्यामुळे सोलापुरातील पत्रकार संघटना, नाभिक संघटना, किराणा दुकान संघटना असे अनेक संघटनांनी सांगली येथील पूरग्रस्त भागातील संघटनाशी संर्पक साधून त्यांना मदत करावी, असे आवाहन सहकारमंत्री देशमुख केले. 

कर्नाटक सरकारच्या सहकार्यामुळे अलमट्टीतून पाणी सोडले

सांगली कोल्हापूर जिह्यातील नद्यांचे पाणी कनार्टकमध्ये वाहून जात असून, काही नद्यांचे पाणी अलमट्टी धरणात जाते. या पाण्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बॅक वॉटरच्या पाण्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याकडे केली. अलमट्टी धरणातून पाणी सोडल्यानंतर कर्नाटकामधील लोकांनाही त्रास सहन करावा लागत असून दोन्ही राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून पाणी सोडले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. असेही सहकारमंत्री  देशमुख म्हणाले.

Related posts: