|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाऊसाहेब बांदोडकरांचे कार्य अजरामर राहील

भाऊसाहेब बांदोडकरांचे कार्य अजरामर राहील 

सभापती राजेश पाटणेकर यांचे प्रतिपादन

वार्ताहर/ पणजी

साक्षरतेत गोव्याचा जो आज पहिला क्रमांक आहे त्याचे श्रेय भाऊसाहेब बांदोडकर यांना जाते. त्यांनी प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठ स्तरापर्यंतच्या शिक्षणाचा पाया घातला. सगळ्य़ा क्षेत्रात गोवा राज्य आदर्श बनविण्यासाठी ते झटले. सर्वसामान्यांच्या हृदयात भाऊसाहेबांना आदराचे स्थान होते आणि अजूनही आहे. त्यांचे जीवनचरित्र व कार्य अजरामर राहील, असे गौरवोद्गार सभापती राजेश पाटणेकर यांनी येथे काढले.

गोमंतक मराठा समाजातर्फे संस्थेच्या येथील राजाराम पैंगीणकर सभागृहात गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी झालेल्या कार्यक्रमात राजेश पाटणेकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. व्यासपीठावर भाऊसाहेब बांदोडकर यांचे नातू व गोवा इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष यतिन काकोडकर, समाजाचे अध्यक्ष गोरख मांद्रेकर, दै. ‘तरुण भारत’चे संपादकीय विभाग प्रमुख राजू नाईक, समाजाचे सचिव प्रशांत मांद्रेकर, उपाध्यक्ष नंदकिशोर शिरगावकर, कोषाध्यक्ष उमाकांत धारगळकर, सहसचिव किरण बाळ्ळीकर, परीक्षक सुदन नाईक गावकर, आश्विनी अशोक जांबावलीकर व उपस्थित होते.

राजेश पाटणेकर यांनी सांगितले की, गोमंतक मराठा समाज इतर समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. केवळ आपल्या जाती समाजाचाच विचार करीत नाही ही गोष्ट कौतुकास्पद आहे व त्यामुळे या समाजाबद्दल आपणाला आदर वाटत आला आहे.

भाऊसाहेबांनी लोकाभिमूख, स्वच्छ प्रशासन दिले : यतिन काकोडकर

यतिन काकोडकर म्हणाले की, पोर्तुगीजांच्या अंमलातून 1961 साली गोव्याची मुक्ती झाली तेव्हा गोवा मागासलेला होता. साधन सुविधांचा अभाव होता. अशावेळी भाऊसाहेब बांदोडकर यांनी साधन सुविधा विकसित केल्या. आधुनिक गोव्याचा पाया घातला. अनेक कंपन्या गोव्यात आणल्या. गोव्याचे भूषण ठरलेली कला अकादमीची वास्तु साकारली. पणजी जिमखान्याची स्थापना केली. बांदोडकर फुटबॉल ट्रॉफी स्पर्धा सुरु केली. गावागावात शिक्षणाची गंगा पोहोचवली. त्यांनी लोकाभिमूख, स्वच्छ प्रशासन दिले. कसेल त्याला जमिनीचा हक्क मिळावा म्हणून आपल्या मगो पक्षातर्फे त्यांनी कार्य केले. मागासवर्गीय आज उच्च पदावर पोहोचले त्याचे श्रेय भाऊसाहेब व त्यांच्या मगो पक्षाला दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

पुण्यतिथी केवळ कार्यक्रम नव्हे एक स्तुत्य चळवळ : नाईक

राजू नाईक म्हणाले, भाऊंची पुण्यतिथी ही गोमंतक मराठा समाज केवळ कार्यक्रम म्हणून न करता एक चळवळ म्हणून राबवत आहे. आजच्या पीढीमध्ये भाऊसाहेबांच्या विचारांची रुजवण त्याद्वारे होत आहे. पहिली ते पुढील सर्व अभ्यासक्रमात भाऊसाहेब यांच्याविषयी धडा हा असायलाच हवा, असे मत त्यांनी मांडले आणि त्यासंबंधी आश्वासने देणाऱया राजकारण्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंतही व्यक्त केली. भाऊंनी दूरदृष्टीने अनेक चांगले प्रकल्प राबविले याबद्दलही त्यांनी उहापोह केला.

यानिमित्त गोवा माध्यमिक विद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी व अ. गो. प्राथमिक शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला अशा स्पर्धा घेण्यात आल्या. परीक्षकांच्या वतीने सुदन नाईक गावकर व राजू नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सुदन गावकर यांनी सांगितले की, वक्तृत्व स्पर्धेत बोलताना पाठांतरावर भर देऊ नये. विचार सुस्पष्ट मांडावेत. एखादा विचार करायला लावणारा मुद्दा मांडणे आवश्यक असते. देहबोली ही महत्त्वाची असते व मुद्दे मांडताना चुकीचे शब्द उच्चारले जाणार नाहीत याचे भान ठेवायला हवे.

गोरख मांद्रेकर यांनी स्वागतपर भाषणात भाऊंचे कार्य नव्या पिढीसमोर यावे या हेतूने त्यांच्या जीवनावर तालुकास्तरावर व राज्यस्तरावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे स्पष्ट केले. प्रशांत मांद्रेकर यांनी सूत्रसंचालन केले. गोपाळ नाईक यांनी आभार मानले. दीप प्रज्वलीत भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.

Related posts: