|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अनमोड मार्ग अचानक बंद केल्याने गोंधळ

अनमोड मार्ग अचानक बंद केल्याने गोंधळ 

प्रतिनिधी/ मडगाव

अनमोडमार्गे गोवा ते बेळगाव वाहतूक गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे दुचाकी चालक तसेच हलक्या वाहनांना मोठा दिलासा मिळाला होता. पण, काल सोमवारी दुपारी अचानक ही वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे गोव्यातून बेळगांवकडे जात असलेल्या प्रवाशांना त्रास झाला. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. नंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

अनमोड रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पण, गेल्या काही दिवसापासून गोव्यात तसेच बेळगांव परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने चोर्ला घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यामुळे दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेला अनमोड रस्ता वाहतुकीसाठी प्रवाशांनीच खुला केला होता. हा रस्ता अधिकृतरित्या खुला करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे काल तो पुन्हा बंद केला. पण, प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तो पुन्हा सुरू करण्यात आला.

केवळ हलकी वाहतूक सुरु

शुक्रवारपासून पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर चोर्ला मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. त्यामुळे गोव्याला भाजीपाला, चिकन, मटण, अंडी व दूध या सारख्या जीवनाश्यक वस्तु उपलब्ध झाल्या. गोवा-बेळगांव संपर्क तुटल्यात जमा असतानाच, अनमोडमार्गे प्रवाशांनी सक्तीने बंद करण्यात आलेली वाहतूक सुरू केली. पण, अवजड वाहने नेता येत नसल्याने जीवनाश्यक वस्तूचा पुरवठा होऊ शकला नाही. केवळ दुचाकी व हलकी वाहने तेव्हढीच अनमोडमार्गे ये-जा करीत होती.

काल दुपारी अनमोड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पण, त्याची कल्पना नसलेले अनेक प्रवासी बेळगांवहून गोव्याकडे व गोव्यातून बेळगांवकडे जात होते ते मध्येच अडकून पडले. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी वातावरण बरेच संतप्त झाले होते. नंतर ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

अनमोड-हेम्मडगा वाहतूक बंद

दरम्यान, अनमोड (रामनगर) येथून हेम्मडगा मार्गे खानापूर पर्यंत वाहने जंगल भागातून जात असतात. पण, काल हा रस्ता देखील खचल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. दोन दिवसांच्या विश्रांती नंतर काल सोमवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने समस्येत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास पुन्हा एकदा गोवा-बेळगांव संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर हा संपर्क तुटला तर गोव्याला पुन्हा एकदा जीवनाश्यक वस्तुसाठी जबरदस्त संघर्ष करावा लागणार आहे.

Related posts: