|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कर्जाला कंटाळून दाम्पत्याची विहिरीत उडी

कर्जाला कंटाळून दाम्पत्याची विहिरीत उडी 

रत्नागिरी / प्रतिनिधी

रत्नागिरी शहरानजीक कुवारबाव येथे कर्जबाजारी झालेल्या दाम्पत्याने 40 फुट खोल विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडल़ी  यात पतीचा बुडून मृत्यू झाल़ा तर पत्नीला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढत ग्रामस्थांनी तिचे प्राण वाचवले आहेत. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ 

पर्शुराम जानू चव्हाण (55, ऱा शेटय़ेनगर, कुवारबाव) असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी सरिता  (50) गंभीर जखमी आहेत. पर्शुराम व सरीता चव्हाण हे दाम्पत्य सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास मॉर्निंगवॉकसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते, अशी माहिती त्यांच्या मुलीने पोलिसाना दिल़ा

कुवारबाव येथील माने इंटरनॅशनल स्कूलजवळील विहिरीमध्ये हे दोघे दोघेही स्थानिकांना आढळून आल़े यावेळी श्री जय भैरी मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी पेनच्या सहाय्याने दोघांनाही बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केल़े यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी पर्शुराम यांना तपासणीनंतर मृत घोषीत केले तर गंभीर जखमी असलेल्या सरिता यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. श्री जयभैरी मित्रमंडळाच्या राजेश तोडणकर, सुशील आयवळे, रोहन मयेकर, अजित सावंत यांनी दोघांनाही काढण्यात महत्वाची भूमिका पार पाडल़ी

पर्शुराम हे रत्नागिरी एसटी विभागामध्ये वाहक म्हणून कार्यरत होत़े मात्र गेल्या काही वर्षापूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होत़ी कुवारबाव येथे त्यांचे चपलांचे दुकान असून व्यवसायातील अडचणी व नोकरीतील निलंबन यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. हे कर्ज फेटण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना नैराश्य आले होते. पर्शुराम यांना दोन मुले असून मुलगा नोकरीनिमित्त मुंबईत आहे. तर विवाहीत मुलगी काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीसह त्यांच्या घरी राहण्यासाठी आली होत़ी

अंत्यसंस्कार रत्नागिरीत करण्याची विनंती

पर्शुराम यांनी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आत्महत्या करणार असल्याचे चिठ्ठीत नमुद केले आह़े यावेळी आपला मृतदेह गावी न नेता रत्नागिरी येथेच अंतिम संस्कार करावेत असे चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवले आहे.