|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पालकमंत्री, खासदारांची जिल्हय़ाकडे पाठच

पालकमंत्री, खासदारांची जिल्हय़ाकडे पाठच 

प्रतिनिधी/ चिपळूण

  तिवरे धरण दुर्घटनेपाठोपाठ जिल्हय़ाला अतिवृष्टी व पुराचा मोठा फटका बसला. त्यातच अनेक गावात भुस्खलन व भेगांचे प्रकार घडत आहेत. या आपत्तींनी जनता भयभीत झालेली असताना पालकमंत्री रवींद्र वायकर व खासदार विनायक राऊत यांनी मात्र जिल्हय़ाकडे पाठच फिरवलेली दिसून येत आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आहेत कोठे, असा संतप्त सवाल जनतेमधून उपस्थित होत आहे.

   गेल्या जुलै महिन्यात घडलेल्या तिवरे धरण दुर्घटनेनंतर तेथील आपग्रस्तांना साहित्य वाटपासाठी पालकमंत्री वायकर आले होते. मात्र या दुर्घटनेला महिना उलटून गेला आहे. शिवाय या महिनाभरात चिपळूणसह राजापूर आणि अन्य शहरांना वारंवार पुराने विळखा घालत तेथील बाजारपेठ उद्ध्वस्त केली. व्यापाऱयांच्या नुकसानीबरोबरच अनेकांचे संसारही पुरात उद्ध्वस्त झाले. मात्र या नुकसानीची पहाणी करण्यासही पालकमंत्री वायकर व खासदार राऊत यांना वेळ मिळालेला नाही.

  अतिवृष्टीकाळात वाशिष्ठी आणि जगबुडी पूल वारंवार बंद करावा लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बराच काळ बंद ठेवावी लागली. याचबरोबर सध्या गावोगावांत डोंगरच्या डोंगर भूस्खलनाने कोसळू लागले आहेत. दररोज गावागावातून डोंगराना भेगा जात असल्याने जनतेत घबराट पसरलेली आहे. प्रशासन जनतेच्या मदतीला धावत असताना लोकप्रतिनिधीनी मात्र पाठ फिरवलेली दिसून येत आहे.

  गेले महिनाभर नैसर्गिक आपत्तीशी जिल्हय़ातील जनतेला सामना करावा लागत आहे. अजून कोणत्याही नुकसान भरपाईचे वाटप झाले नसून पंचनाम्याची कामेही पूर्ण झालेली आहेत. जिल्हय़ावर मोठी आपत्ती आलेली असताना पालकमंत्री वायकर मात्र मुंबईत बसून आहेत, तर खासदार राऊत यांचा पत्ताच नाही. यामुळे जिल्हावासियात खदखद आहे.

Related posts: