कोल्हापूर : महापुरात 20 हजार गणेशमूर्ती जलमय

ऑनलाइन टीम / कोल्हापूर :
अनेक अडचणांवर मात करत सुरू असलेला बापट कॅम्पमध्ये गणेशमूर्तींचा व्यवसाय पंचगंगेच्या महापुराने उद्ध्वस्त झाला आहे. वसाहतीत महापुराचे पाणी गेल्याने कोटय़ावधींचे नुकसान झाले आहे. जवळपास 80 टक्के वसाहत महापुरात बुडाली आहे. सुमारे 40 हजारांवर मध्यम आकाराच्या कच्च्या मूर्ती तर रंगवलेल्या 20 हजारावर मूर्ती जलमय झाल्या आहेत. वर्षभराची मेहनत आणि पुंजी वाया गेलीच. शिवाय उधरीवर घेतलेले प्लास्टर, रंगसाहित्य आणि रॉ मटेरियल अंगावर पडले आहे. मूर्ती तयार करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम वेगळीच. कुटुंबाचे वर्षाचे उदरनिर्वाहाचे साधन महापुराने पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. अनेक कारखान्यांतील शाडूच्या मूर्ती जाग्यावरच विरघळल्या आहेत तर प्लास्टरच्या मूर्ती पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. केवळ मूर्तीच पाण्यात बुडाल्या आहेत असे नाही तर एका प्लास्टरच्या दुकानातील सुमारे 3 हजार पोती जलमय झाली आहेत.