|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » 92 पासबुकांमधील 90 लाखांचा अपहार

92 पासबुकांमधील 90 लाखांचा अपहार 

कुडाळ पोस्टातील गैरव्यवहारप्रकरण : राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन : मनसे, स्वाभिमानचाही पाठिंबा

सीबीआयकडे तक्रार दाखल

संशयित एजंटाचे सहकार्य नाही!

गैरव्यवहार हेतूपुरस्सर!

शुक्रवारी सीबीआयचे अधिकारी कुडाळात?

प्रतिनिधी / कुडाळ:

कुडाळ पोस्टात झालेल्या अपहाराच्या चौकशीस संशयित एजंट सहकार्य करीत नाही म्हणजे गैरव्यवहार हे हेतूपुरस्सर केलेले कृत्य आहे. 30 जूनपर्यंत झालेल्या चौकशीत 92 पासबुकांमध्ये 90 लाख 15 हजार रु. एवढय़ा रकमेचा अपहार झाला आहे. त्याची तक्रार 1 ऑगस्ट रोजी सीबीआयकडे देण्यात आली आहे, असे चौकशी अधिकारी गणपत राणे यांनी दिलेले पत्र अमित सामंत यांनी वाचून दाखविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवारचे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, चौकशी अजूनही संपलेली नसल्याने फसलेल्या खातेदारांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन सामंत यांनी करीत येत्या शुक्रवारी सीबीआयचे अधिकारी येथे येतील, अशी आपली माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘कुडाळ पोस्टान केल्यान काय, गरिबांचे पैसे खाल्यान काय?’, ‘फसव्या एजंटाला पाठिशी घालणाऱया अधिकाऱयांचा निषेध असो’, ‘गरिबांचे पैसे गणेश चतुर्थीपूर्वी परत द्या’ अशा घोषणा देत राष्ट्रवादीने आज सकाळी कुडाळ पोस्टासमोर धरणे आंदोलन छेडले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अमित सामंत व कुडाळ तालुका अध्यक्ष भास्कर परब यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात मनसे नेते परशुराम उपरकर, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह राजन दाभोलकर, धीरज परब, शिवाजी घोगळे, नझीर शेख, राकेश कांदे, सुनील बांदेकर, आबा धडाम, बाळ कनयाळकर, साबा पाटकर, कुणाल किनळेकर, प्रफुल्ल सुद्रिक, राजन घाडी यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.

गरिबांच्या पैशांसाठी आंदोलन तीव्र करणार

सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीने धरणे आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनास मनसे व स्वाभिमानने पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही जनतेबरोबर आहोत. पोस्टावर विश्वास ठेवायचा की नाही, असा संभ्रम कुडाळ पोस्टाच्या कारभारावरून सर्वसामान्यांमध्ये आहे. पोस्टाने आपला विश्वास संपादन करावा. गरिबांचे पैसे त्यांना परत मिळावेत, यासाठी आंदोलन तीव्र करावे लागेल, असा इशारा उपरकर व तेली यांनी दिला.

आंदोलक आक्रमक

चौकशी अधिकारी राणे यांनी माहिती देताना सीबीआयकडे चौकशीसाठी अहवाल पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याची माहिती आपण देऊ शकत नाही, असे सांगताच आंदोलकांनी त्यांना विविध प्रश्न विचारत धारेवर धरले. पोस्टाचे कागद बाहेर जातात. त्यावेळी तुमचे नियम कोठे जातात? ठेवीदार आज आले असते, तर आतच घुसले असते. तुम्हाला पळता भुई थोडी झाली असती. आता आम्ही आत जाणार आणि कुलुप लावणार, अशी तंबी देत आक्रमक झाले.

आंदोलन मागे

अमित सामंत यांनी आक्रमक कार्यकर्त्यांना शांत केले. ते पत्र दाखवा, म्हणजे झाले. त्यात गोपनीयता कसली? तुम्हाला आंदोलन पेटवायचे आहे का? तसे असेल, तर सांगा, असे ते म्हणाले. पोलीस निरीक्षक शंकर कोरेंनी राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राणे यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून ते पत्र सामंत यांच्याकडे दिले. त्यांनी ते वाचून दाखविले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बावीसपैकी एकच एजंट संशयित!

कुडाळ पोस्टात एकूण 22 एजंट काम करतात. त्यापैकी एकच एजंट संशयित आहे. त्याचा उल्लेख सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत आहे. असे पत्र वाचन केल्यानंतर बोलताना अमित सामंत यांनी सांगितले. सीबीआयने काही कागदपत्रांची मागणी केली आहे. येत्या शुक्रवारी सीबीआयचे अधिकारी येथे येतील, अशी आपली माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.

सेना पदाधिकाऱयांनीही घेतली माहिती

राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, संतोष शिरसाट, जीवन बांदेकर, नितीन सावंत, किरण शिंदे, बाळा वेंगुर्लेकर यांनी चौकशी अधिकारी राणे यांची भेट घेऊन माहिती घेतली.

वैभव नाईकना पाठविले कुलूप

‘कुलूप घालणाऱयांचे झाले काय, पुरात वाहून गेले काय?’ असा सवाल परशुराम उपरकर यांनी करीत व ‘आमदारांना कुलूप मिळाले नसेल’ असे सांगत वैभव नाईक यांच्या कणकवलीच्या पत्त्यावर पोस्टानेच कुलूप पाठविले.

Related posts: