|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » वैभववाडी-कोल्हापूर मार्ग 12 दिवसांनंतर पूर्वपदावर

वैभववाडी-कोल्हापूर मार्ग 12 दिवसांनंतर पूर्वपदावर 

प्रतिनिधी / वैभववाडी:

मार्गावर आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बंद असलेला वैभववाडी-कोल्हापूर मार्ग पूर्ववत सुरू झाला आहे. मंगळवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. तब्बल बारा दिवसांनंतर हा मार्ग सुरू झाल्याने वाहन चालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

वैभववाडी-कोल्हापूर राष्ट्रीय मार्गावर कळे व मांडुकली येथे रस्त्यावर पाणी आल्याने 1 ऑगस्टपासून हा मार्ग बंद होता. तेव्हापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने कोल्हापूर व सांगली येथे पुराचे पाणी आल्याने गेले 12 दिवस हा मार्ग ठप्प झाला होता. त्यामुळे एस. टी. सेवेबरोबरच सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. अतिवृष्टीत कोल्हापूरकडे जाणारे सर्व मार्ग बंद झाल्याने वाहन चालकांना त्याचा मोठा फटका बसला. काही वाहने गेले काही दिवस वैभववाडी येथेच उभी करून ठेवण्यात आली होती. वाहन चालकांप्रमाणे या मार्गावरून नियमित प्रवास करणारे प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली होती. 

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील बहुतांश व्यापार हा पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असतो. या व्यापाऱयांनाही मार्ग बंद असल्याने मोठा तोटा सोसावा लागला. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा काही अवजड वाहन चालकांनी या मार्गावरून आपली वाहने मार्गस्थ केली होती. मात्र, मंगळवारी या मार्गावरील वाहतूक खऱया अर्थाने सुरू झाली. मंगळवारी कोल्हापूर येथून येणारी पहिली कोल्हापूर-पणजी एस. टी. बस मार्गस्थ करण्यात आली. ही बस सकाळी साडेदहा वाजता वैभववाडी बसस्थानकात दाखल झाली.

Related posts: