|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्वातंत्र्य चळवळ आणि साहित्यिक

स्वातंत्र्य चळवळ आणि साहित्यिक 

स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्षात भारत पाकिस्तानच्या खूप पुढे आहे. परंतु भारतातही लोकांच्या हातांना काम नाही. दुष्काळ आणि पुराच्या सपाटय़ात लाखो कुटुंबांची वाताहत होत आहे. अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर अप्रत्यक्षपणे बंधने घालण्याचाही प्रयत्न होतो आहे. मात्र तरीही, इथे लष्करशाही नाही, तर लोकशाहीच आहे. याचे कारण आपल्या इथल्या लेखनपरंपरा स्वातंत्र्यलढय़ाच्या मुशीतून विकसित झाल्या आहेत. म्हणूनच वाढत्या सामाजिक गुह्यांचा निषेध लेखक-कलावंत करतात. रवीशकुमारसारखे पत्रकार सरकारची भीडभाड ठेवत नाहीत. रामचंद्र गुहांसारखे लेखक दहशतीचा मुकाबला करतात. ही परंपरा फार जुनी आहे. मला इथे आठवण येते ती महात्मा गांधीजींचे चरित्रकार डी. जी. तेंडुलकर यांची. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमधून पदवीधर झाल्यावर डीजींनी केंब्रिजमधून गणिताचा अभ्यास करून पदवी मिळवली. अधिक शिक्षण घेण्याचे मनात असताना महात्माजींचे आंदोलन सुरू झाले तेव्हा ते भारतात आले. या चळवळीत त्यांनी भाग घेतला. चळवळ थांबल्यावर शिष्यवृत्ती मिळवून डीजी जर्मनीत गेले. पण तोवर हिटलरचा उदय झाला आणि कम्युनिस्ट म्हणून डीजींना तुरुंगात टाकण्यात आले. मुक्तता झाल्यानंतर डीजी पॅरिसला गेले आणि तेथे ते प्रेंच लेखक व नाटककार रोमाँ रोलाँना भेटले. भारतातील सामान्यजनांच्या जीवनाचे क्षण टिपणारी, आपण काढलेली छायाचित्रे त्यांनी रोलाँना दाखवली. डीजींची नेहरूंशीही मैत्री होती. चळवळीशी असलेल्या संबंधांमुळे त्यांचे लेखनही जीवनदर्शी बनले.

माझ्या पिढीला ग. दि. माडगूळकर यांना बघण्याची संधी मिळाली. ज्या माणदेशी गावात ते वाढले, ते गाव श्रीधरकवीच्या गावापासून जवळच होते. श्रीधर, मोरोपंत, वामन पंडित गदिमांना मुखोद्गत होते, पण औंधमध्ये त्यांच्यावर स्वातंत्र्य चळवळीचाही संस्कार झाला. बेचाळीसच्या चळवळीत सातारा जिह्यात गदिमांनी स्वातंत्र्याचे पोवाडे रचावे आणि शाहीर निकमांनी ते गाऊन, जिल्हा ढवळून काढावा, असे चालायचे. महाराष्ट्रात टिळकयुगात हरिभाऊ आपटय़ाचेही युग बहरलेले होते. ऐतिहासिक असोत वा सामाजिक असोत, हरिभाऊंना आपल्या कादंबऱयांद्वारे देशप्रेम जागे करायचे होते आणि सामाजिक सुधारणांचाही पुरस्कार करायचा होता. त्यानंतरच्या पिढीतले ना. सी. फडके हे गुलछबू जीवनाचे चित्रण करणारे कादंबरीकार म्हणून प्रसिद्धी पावले. पण अनेकांना हे माहीत नाही की फडक्मयांनी असहकारितेच्या चळवळीत भाग घेतला होता आणि संतती नियमनाचा पुरस्कार करून प्राध्यापाकाची नोकरीही गमावली होती. फडक्मयांनीही पुढे स्वातंत्र्य चळवळीवर व सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेवर कादंबऱया लिहिल्या, पण त्यांच्या वृत्तीला न पेलवणारेच हे विषय होते. श्री. शं. तथा काकासाहेब नवरे शालेय जीवनापासून स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. महात्माजींच्या असहकारिता आंदोलनात, तसेच काँग्रेसच्या कामातही ते सहभागी झाले होते. मुंबईच्या ‘प्रभात’ तसेच गोव्याच्या ‘गोमंतवाणी’चे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. टिळकांप्रमाणेच काकासाहेबांचेही मृत्युलेख गाजले. काकासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही उत्साहाने सहभाग घेतला. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. तेव्हा 1 ऑगस्टला टिळकांचे पुण्यस्मरण करण्यासाठी निर्भयपणे चौपाटीला जमावे असे पहिले आवाहन नागरिकांना केले ते काकासाहेबांनी. ‘नवाकाळ’चे संपादक अप्पासाहेब खाडिलकर हे काकासाहेब खाडिलकरांचे चिरंजीव. काकासाहेबांच्या देशभक्तीच्या संस्कारांमुळे अप्पासाहेबांनीही स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या कार्याला वाहून घेतले. मुंबईतील गिरगाव काँग्रेस समितीचे ते अध्यक्ष होते. खादीचे व्रत त्यांनी त्याच वयात घेतले, ते अखेरपर्यंत सोडले नाही. पोलिसी लाठीमारात त्यांचे डोकेही फुटले होते. अप्पासाहेबांचे अग्रलेखही तिरकस व वाचनीय असत. त्यांनी कादंबऱया लिहिल्या व नाटकही.

तर प्राध्यापक न. र. फाटक हे तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी. विविध ज्ञानविस्तार, इन्दुप्रकाश, नवाकाळ, विविधवृत्त यात ते लिहीत आणि नवाकाळच्या संपादक वर्गातही ते होते. मात्र फाटक हे न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांवर लुब्ध होते आणि सुधारक पक्षाचे समर्थक होते. लोकमान्य टिळकांबद्दल त्यांनी टीकात्मक लेखन केल्यामुळे टिळकभक्त रागावलेही होते. परंतु न. र. कृत  लोकमान्य चरित्र अत्यंत सरस व प्रेरणादायी आहे. विख्यात साहित्यिक पु. भा. भावे यांची सावधान व आदेश ही नियतकालिके होती. ते हिंदुत्ववादी होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे गुरु होते. मात्र भावे यांचे वैशिष्टय़ म्हणजे, हिंदुत्ववादाच्या कक्षा ओलांडून, त्यांनी रसरशीत कथा-कादंबऱया लिहिल्या. बंगाली, पंजाबी वा सिंधी निर्वासितांसंबंधी त्यांनी फाळणीच्या पार्श्वभूमीवरील कथा लिहिल्या. भावे यांच्यातील हिंदुत्ववादाची छाया या कथांवर नव्हती, हे विशेष. वि. स. खांडेकरांच्या हृदयाची हाक, कांचनमृग, उल्का, दोन ध्रुव, पांढरे ढग, दोन मने, क्रौंचवध व ययाति या कादंबऱया वाचून ते भारावून गेले होते. खांडेकरांच्या लिखाणातून गरीब, दलित, शोषित, पीडित वर्गाबद्दल सहानुभूतीचे निर्झर वाहत असत. ध्येयवाद हे त्यांच्या नायकाचे मुख्य वैशिष्टय़ असे. खांडेकरांचे नायक खरोखरच मानवतावादी होते. त्यांच्या ‘दोन ध्रुव’ मधील गांधीवादी विचारसरणीच्या व्यक्तीचे चित्रण रत्नागिरी जिह्यातील सुप्रसिद्ध गांधीवादी नेते अप्पासाहेब पटवर्धन यांना डोळय़ांसमोर ठेवून केले होते.

मामा वरेरकर यांच्या ‘धावता धोटा’ या कादंबरीत गिरणगावचे व कामगार समस्यांचे यथार्थ चित्रण होते. नव्या औद्योगिक संस्कृतीत हा जो महत्त्वाचा वर्ग विकसित होत होता, त्याचा ललित सहित्यातला हा प्रथम आविष्कार. मराठी साहित्यिक जेव्हा केवळ मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे चित्रण करण्यात गुंतले होते, तेव्हा वरेरकर-खांडेकरांनी मराठी साहित्याला नवी दिशा दिली. ग. प्र. प्रधान स्वातंत्र्य चळवळीसोबतच राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी चळवळीत सक्रिय होते. महाराष्ट्र विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. ‘साधना’ साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षं काम केले. त्यांनी त्यांच्या राजकीय-सामाजिक जीवनावर ‘साठा उत्तरांची कहाणी’ लिहिली आहे, ती जबरदस्त आहे. नानासाहेब गोरेही साधनेचे संपादक होते आणि वसंत बापटही. हे सर्व स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते आणि साहित्यिक म्हणूनही मोठे होते.  ‘लेखकाचा राजकारणाशी काय संबंध? तुम्ही कुठे पत्रकार आहात? तुम्ही कथा-कादंबऱया लिहिता, तुम्हाला कुठे आहे सेन्सारशिप असे काहीजण म्हणतात. एखाद्या बाळंतिणीच्या यातना पाहून आपला जीव कळवळतो. तेव्हा तुम्ही कुठे बाळंतीण आहात, असा प्रश्न विचारण्यासारखे हे आहे. हरि नारायण आपटे यांनी ‘पण लक्षात कोण घेतो’ मध्ये विधवेचे दु:ख मांडले. ते काय स्वतः विधवा होते? आम्ही कथा-कादंबऱया लिहितो म्हणजे काय करतो? माणसाच्या अंतःकरणातील कढ लिहीत असतो ना? ज्या ज्या क्षणी जे जे झोंबते, ते लिहिण्याकरिता आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे,’ असे उद्गार पु, ल. देशपांडे यांनी काढले होते. आणीबाणीनंतर विचार स्वातंत्र्याच्या हक्कासाठी ते लढले. शेवटी लढणारा साहित्यिक हाच खरा. ही लढाई अजूनही संपलेली नाही.

नंदिनी आत्मसिद्ध 

Related posts: