|Saturday, December 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सुषमा स्वराज सर्वांसाठीच प्रेरणास्रोत !

सुषमा स्वराज सर्वांसाठीच प्रेरणास्रोत ! 

श्रद्धांजली सभेत पंतप्रधान मोदींचे उद्गार : विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून जगभरातील भारतीयांचे प्रश्न सोडविले, अजातशत्रू व्यक्तिमत्व

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आयोजित श्रद्धांजली सभेत माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज सर्वांसाठीच प्रेरणास्रोत होत्या, असे उद्गार काढले आहेत. वैयिक्तक जीवनात मोठी उंची गाठूनही व्यवस्थेंतर्गत मिळालेले कुठलेही काम स्वतःला झोकून पूर्ण करणाऱया स्वराज यांच्यापेक्षा कुठलीच मोठी प्रेरणा कार्यकर्त्यांसाठी असू शकत नसल्याचे मोदी म्हणाले.

स्वराज यांनी यंदा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीही त्यांनी असा निर्णय घेतला असता मी आणि व्यंकय्या नायडू यांनी त्यांची भेट घेत कर्नाटकातील विशेष स्थितीमुळे निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित होता आणि ते अत्यंत आव्हानात्मक काम होते तरीही त्यांनी पक्षासाठी ती जबाबदारी पेलली. यावेळीही सर्व सांभाळून घेऊ असे त्यांना समजाविले होते, पण त्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिल्याचे मोदी म्हणाले.

निकाल येताच निवासस्थान रिकामे

एखाद्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर शासकीय निवासस्थान रिकामे करविण्यासाठी कित्येक वर्षे नोटीस पाठवत रहावी लागते. पण स्वराज यांनी निवडणूक निकाल लागताच सर्वप्रथम शासकीय निवासस्थान रिकामे करत स्वतःच्या घरात जाण्याचे पाऊल उचलले. सार्वजनिक जीवनात या गोष्टी बरेच काही सांगून जातात, असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

श्रीकृष्णाच्या भक्त

स्वराज यांचे भाषण प्रभावी असण्यासह प्रेरकही असायचे. त्या कृष्णभक्तीला समर्पित होत्या, आमची भेट व्हायची तेव्हा त्या जय श्रीकृष्ण म्हणायच्या आणि मी त्यांना जय द्वारकाधीश असे म्हणत होतो. त्यांच्या जीवनावर दृष्टीक्षेप टाकल्यास कर्मण्येवाधिकारास्ते म्हणजे काय असते हे उमगतं असल्याचे मोदी म्हणाले. स्वराज यांनी शेकडो व्यासपीठांवर जम्मू-काश्मीरच्या समस्येबद्दल भूमिका मांडली असेल. कलम 370 हद्दपार करण्यात आल्याने त्यांचे मोठे स्वप्न पूर्ण झाले. स्वराज यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या बांसुरीला भेटलो असता कलम 370 रद्दच्या निर्णयानंतर स्वराज यांना झालेल्या आनंदाची कल्पनाही करणे अवघड झाल्याचे सांगितले होते. त्याच आनंदाच्या क्षणाला जगत सुषमा स्वराज या श्रीकृष्णाच्या चरणी पोहोचल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

प्रोटोकॉल ते पीपल्स कॉल

सर्वसाधारपणे विदेश मंत्रालय म्हणजे कोट-पँट, प्रोटोकॉल या गोष्टींभोवतीच फिरत असते. विदेश मंत्रालयातील प्रत्येक गोष्टीत प्रोटोकॉल सर्वप्रथम असतो. स्वराज यांनी प्रोटोकॉलच्या व्याख्येला पीपल्स कॉलमध्ये बदलून टाकले. जगात राहणाऱया कुठल्याही भारतीयाची समस्या माझी असल्याचे म्हणत त्यांनी विदेश मंत्रालयाद्वारे ती सोडविल्याचे मोदींनी सांगितले आहे. त्या वयाने माझ्यापेक्षा लहान होत्या, पण सार्वजनिक जीवनात त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.

पंतप्रधानांचे मानते आभार

श्रद्धांजली सभेत राजकीय पक्ष तसेच विचारसरणी बाजूला ठेवत अनेक दिग्गज उपस्थित राहिले. शत्रूंना मित्रात बदलण्याचे काम सुषमा यांनी केले होते, त्यांच्या 42 वर्षांच्या राजकीय तपस्येत योगदान दिलेल्यांचे मी आभार मानते. पंतप्रधानांनी वैयक्तिक स्तरावर सुषमा स्वराज यांना साथ दिल्याने त्यांचीही मी आभारी आहे. येथे उपस्थित होत अनेकांनी आमच्या कुटुंबाचे दु:ख हलकं केलं आहे. या दु:खाच्या क्षणी धीर देणाऱया सर्वांचे आभार असे उद्गार स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांनी काढले अहेत.

Related posts: