|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुलमध्ये महिला टी-20 क्रिकेटचा समावेश

राष्ट्रकुलमध्ये महिला टी-20 क्रिकेटचा समावेश 

2022 बर्मिंगहम स्पर्धेत आठ महिला संघांत होणार सुवर्णपदकांसाठी चुरस

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

क्रिकेट हा क्रीडा प्रकार राष्ट्रकुल स्पर्धेत 1998 नंतर प्रथमच सामील करण्यात येणार असून 2022 मध्ये बर्मिंगहम येथे होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला असल्याचे राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशन व आयसीसी यांनी मंगळवारी जाहीर केले.

यापूर्वी राष्ट्रकुलमध्ये फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. 1998 मध्ये कौलालंपूर येथे झालेल्या स्पर्धेत पुरुष क्रिकेटला सामील करण्यात आले होते. त्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक पटकावले होते. 2022 मधील बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत होणार असून महिला क्रिकेटमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. ‘आजचा ऐतिहासिक दिवस असून राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटच्या पुनरागमनाचे आम्ही मनापासून स्वागत करतो,’ असे सीजीएफचे अध्यक्ष डेने लुईस मार्टिन म्हणाले. ‘महिला क्रिकेटसाठी आणि जगातील क्रिकेटप्रेमीसाठी हा खरोखरच ऐतिहासिक क्षण असून त्यांच्या एकसंध पाठपुराव्यामुळेच या स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होऊ शकले आहे,’ असे आयसीसीचे प्रमुख कार्यकारी मनू साहनी यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.

या स्पर्धेतील महिलांचे सर्व सामने एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर होतील. या मैदानावर नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अनेक संस्मरणीय सामने झाले आहेत, त्यात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्याचाही समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा संघटनांनी बर्मिंगहम राष्ट्रकुलमध्ये महिला क्रिकेटचा समावेश होण्यासाठी मतदान केले याचा आम्हाला खूप आनंद झाला असून एक प्रकारे सन्मानच झाला आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील महिलांचा हा सर्वात मोठा क्रीडाप्रकार असेल. आजच्या दिवशी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करून महिला क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे संकेत दिले आहेत,’ असे ईसीबीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले.

गेल्या नोव्हेंबरमध्ये बर्मिंगहम येथे झालेल्या सीजीएफच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आयसीसी आणि इंग्लंड-वेल्स क्रिकेट मंडळाने महिला क्रिकेटचा राष्ट्रकुलमध्ये समावेश करण्याबाबत मागणीअर्ज दाखल केला होता. राष्ट्रकुलमधील क्रिकेटची पूर्ण जबाबदारी आयसीसीवर सोपविण्यात आली असून पंच, सामनाधिकारी आणि अन्य सुविधात पुरविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. ‘महिला क्रिकेटच्या वैश्विक प्रचार व प्रसारासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा उत्तम व्यासपीठ ठरेल, आणि महिला क्रिकेट जगभर विकसित होईल,’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Related posts: