|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत-विंडीज तिसरी वनडे लढत आज

भारत-विंडीज तिसरी वनडे लढत आज 

सलग चार डावात अपयशी ठरलेल्या शिखर धवनसमोर कोंडी फोडण्याचे आव्हान,

पोर्ट ऑफ स्पेन / वृत्तसंस्था

विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज (दि. 14) यजमान विंडीजचा तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यातही धोबीपछाड करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. शिखर धवन मागील सलग 4 डावात भलताच निष्प्रभ ठरला असून अपयशाची कोंडी फोडून काढण्याचे स्वतंत्र आव्हान त्याच्यासमोर असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.

डावखुरा शिखर धवन आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जायबंदी होण्यापूर्वी उत्तम बहरात होता. पण, दुखापतीतून सावरत पुनरागमन केल्यानंतर त्याला अपेक्षित सूर सापडलेलाच नाही. उलटपक्षी, हरएक डावात त्याला बरेच झगडावे लागत आहे. सध्या सुरु असलेल्या विंडीजमधील टी-20 मालिकेत त्याला 1, 23 व 3 धावांवर बाद व्हावे लागले आणि त्यानंतर वनडे मालिकेतील दुसऱया लढतीत केवळ 2 धावांवर समाधान मानावे लागले. धवन विशेषतः आत येणाऱया चेंडूवर अधिक वेळा सहजपणे बाद झाला असून जलदगती गोलंदाज शेल्डॉन कॉट्रेलने दोनवेळा त्याची विकेट काढली आहे.

कसोटी मालिकेची यथोचित सांगता करणार?

धवनचा कसोटी संघात समावेश नाही. त्यामुळे, येथे बहारदार खेळी साकारत कॅरेबियन दौऱयाची यथोचित सांगता करण्याची त्याच्याकडून अपेक्षा असेल. चौथ्या क्रमांकासाठी सध्या श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांच्यात आता बरीच जुगलबंदी रंगत जाणार आहे. मागील सामन्यात चौथ्या स्थानी फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंतला अवघ्या 20 धावा जमवता आल्या. पण, पाचव्या स्थानी उतरलेल्या श्रेयस अय्यरने मात्र 68 चेंडूत 71 धावांची आतषबाजी करत आपला फॉर्म दाखवून दिला, शिवाय आपली दावेदारीही आणखी भक्कम केली.

माजी कर्णधार सुनील गावसकरांनी चौथ्या स्थानी अय्यरवर अधिक विश्वास व्यक्त केला असून या पार्श्वभूमीवर, येथील लढतीत काही बदल होणार की, येथेही ऋषभ पंतलाच चौथ्या स्थानी उतरवले जाणार, ते पहावे लागेल.

पंतचे विकेट फेकणे चिंतेचे

ऋषभ पंतमध्ये फटकेबाजीची क्षमता असली तरी खेळी बहरण्यापूर्वीच त्याचा संयम सुटतो आणि बेजबाबदार फटका लगावत तो आपली विकेट फेकतो, असे सातत्याने दिसून आले आहे. कोणताही संघ या महत्त्वाच्या स्थानी शांत डोक्याने फलंदाजी करणारा फलंदाज धाडणे पसंत करत असतो. त्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघव्यवस्थापन आणखी किती काळ पंतच्या बेभरवशाच्या शैलीवर विश्वास ठेवणार, हे देखील औत्सुक्याचे असेल. गावसकरांनी पंतला चौथ्याऐवजी पाचव्या स्थानी पाठवा, ते अधिक योग्य ठरेल, असे म्हटले होते. त्या सूचनेचा विचार होणार का, हे देखील येथे स्पष्ट होईल.

विराटचा फॉर्म ही जमेची बाजू

कर्णधार विराट कोहलीचा बहारदार फॉर्म ही भारतीय संघाची जमेची बाजू आहे. यापूर्वी दुसऱया वनडे सामन्यात कोहलीने 125 चेंडूत 120 धावांची सर्वोत्तम खेळी साकारत आपला फॉर्म आणखी एकदा सिद्ध केला होता. भारताच्या या दिग्गज फलंदाजाने त्यावेळी अय्यरसमवेतच शतकी भागीदारी साकारत डावाला आकार दिला. तत्पूर्वी, धवन व रोहित शर्मा हे दोन्ही सलामीवीर मात्र स्वस्तात बाद झाले होते.

गोलंदाजीत भुवनेश्वरची कमाल

गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने 8 षटकात 31 धावात 4 बळी घेतले आणि अर्थातच, तोच भारताचा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. मोहम्मद शमी (2-39) व कुलदीप यादव (2-59) यांनी प्रत्येकी दोन बळी घेत समयोचित योगदान दिले. एरवी, आंतरराष्ट्रीय संघ एरवी विजयी लाईनअपमध्ये बदल करणे पसंत करत नाहीत. पण, येथील सामन्यात भारतीय संघव्यवस्थापन येथे शमीला विश्रांती देत नवदीप सैनीला खेळवण्याची संधी नाकारता येणार नाही.

मालिकेत पिछाडीवर असलेला यजमान विंडीज संघ येथे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि यासाठी त्यांची भिस्त शाय होप, शिमरॉन हेतमेयर व निकोलस पूरन यांच्यावरच असणार आहे. उभय संघातील या तिसऱया वनडेनंतर दि. 22 ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिकाही रंगणार आहे.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

वेस्ट इंडीज : जेसॉन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, इव्हिन लुईस, शाय होप, शिमरॉन हेतमेयर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, फॅबियन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डॉन कॉट्रेल, ओशेन थॉमस, केमर रोश.

सामन्याची वेळ : सायं. 7 पासून.

Related posts: