कवण उपासूं गे देवता?
आडदांड दुष्टापुढे वृद्ध सज्जनाचे काय चालणार? रुक्मीने दिलेल्या धमकीमुळे भीष्मकाच्या डोळय़ात अश्रू दाटले व तो अगतिक झाला. रुक्मीने शिशुपालाबरोबर रुक्मिणीच्या विवाहाची जय्यत तयारी सुरू केली. वडिलांना न विचारता सारा कारभार सुरू केला. साऱया नातेवाईकांना, मित्रपरिवारांना निमंत्रण पत्रे लिहिली व वेगाने पाठविली. रथ, घोडे, हत्ती, पालख्या, मेणे त्यांना आणण्यासाठी पाठविले. फक्त द्वारकेला मात्र ही वार्ता जाणार नाही याची काळजी घेतली. आपल्याला अनुकूल शास्त्रार्थ सांगणारे ब्राह्मण बोलावले. राज्यातील सोनार, सराफ, जवाहिरे बोलावून सुंदर अलंकार घडविण्यास सांगितले. देशोदेशीचे कापड व्यापारी व विणकर बोलावले व उंची, जरतारी वस्त्रे बनविण्यास सांगितले. साऱया शहरात घोषणा केली की सर्वांनी घरांना रंग द्या. घरे शुशोभित करा. तोरणे लावा. कमानी उभ्या करा. विवाहासाठी लागणारे सारे साहित्य उत्तम दर्जाचे व अमूल्य असावे, याची रुक्मीने स्वतः जातीने काळजी घेतली. विवाह समारंभाची तयारी जोरात चालू होती, पण … वर शिशुपाळा ऐकतां । दचकली ते राजदुहिता । जैसा सिद्धासी सिद्धिलाभ होता । उठे अवचिता अंतराय। कवण उपासूं गे देवता । कवणकवणा जावे तीर्था । कवण नवस नवसूं आतां । कृष्णनाथप्राप्तीसी जैसा सद्बुद्धीआड कामक्रोधू । कां विवेकाआड गर्वमदू । स्वधर्माआड आळससिंधू । तैसा बंधु रुक्मिया । इकडे शिशुपाल या वराचे नाव ऐकताच भीष्मककन्या, राजदुहिता रुक्मिणी दचकली. ती अतिशय दु:खी होऊन उसासे टाकू लागली. ही गोष्ट तिच्या जिव्हारी झोंबली. ती महालात जाऊन मंचकावर धाडकन पडली व ओक्साबोक्षी स्फुंदू लागली. तपश्चर्या पूर्ण झाल्यावर परमेश्वर प्राप्त होण्याची वेळ आली आणि अचानक संकट यावे व देव अंतरावा असे तिला झाले. काय करावे हे तिला समजेना. कोणत्या देवाची उपासना करू? कोणाला शरण जाऊ? कोणत्या तीर्थास जाऊ? कोणत्या देवाला नवस करू? अशी तिची अवस्था झाली. सद्बुद्धीच्या आड कामक्रोध येतात. विवेकाच्या आड गर्वमद येतात. स्वधर्माचरणाच्या आड आळस येतो. तसा रुक्मिणीच्या कृष्णाशी विवाह करण्याच्या मनिषेच्या आड रुक्मी आला.
रुक्मिणी दु:खाने अबोल झाली व महालात मंचकावर झोपली. कोणाही सखीशी ती बोलेना. आई शुद्धमती धावत आली आणि रुक्मिणीच्या दु:खाचा बांध फुटला. गळा मिठी घालून रडू लागली. आई बिचारी हतबल झाली होती, ती म्हणाली-मुली, मी असहाय आहे. काय करू?
रुक्मिणीच्या या असहाय अवस्थेचे वर्णन करणारे अवीट नाटय़गीत स्वयंवर नाटकात आहे, ते असे –
वद जाउं कुणाला शरण करी जो हरण संकटाचें ।
मी धरिन चरण त्याचे । अग सखये । बहु आप्त बंधु बांधवां । प्रार्थिलें कथुनि दु:ख मनिंचें । तें विफल होय साचें । अगं सखये । मम तात जननि मात्र तीं बघुनि कष्टती हाल ईचे । न चालेचि कांहिं त्यांचें। अग सखये । जे कर जोडुनि मजपुढें नाचरें थवे यादवांचे । प्रतिकूल होति साचे । अग सखये ।
Ad. देवदत्त परुळेकर