|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरवासियांना आजपासून होणार पाणीपुरवठा

शहरवासियांना आजपासून होणार पाणीपुरवठा 

हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा बंद असल्याने आठ दिवसाआड मिळणार पाणी

प्रतिनिधी/  बेळगाव

हिंडलगा पंपिंग स्टेशनमधील विद्युतपंप दुरूस्त करण्यात आले असून लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवारी शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

 राकसकोप जलाशयामधून शहराला 12 एमजीडी पाणी पुरविण्यात येणार आहे. मात्र हिडकल जलाशयातून होणारा पाणीपुरवठा सध्या बंद असल्याने आठ दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली.

मार्कंडेय नदीचे पाणी हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये घुसल्याने लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. परिणामी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पंपिंग स्टेशनमधील विद्युतपंप बाजूला सुरक्षितपणे ठेवण्यात आले होते. मात्र स्टार्टर तसेच स्वीच बोर्ड पाण्याखाली गेले होते. पाणी ओसरल्याने दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले. सदर काम सोमवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यानंतर विद्युतपंपांद्वारे लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी जलशुद्धीकरण प्रक्रिया करून पाणीसाठा करण्यात येत आहे. पण मंगळवारी दुपारी या पंपिंग स्टेशन परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला होता. मंगळवारी सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. बुधवारपासून शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

हिडकलच्या वीजपंपांचे नुकसान

हिडकल जलाशयातून होणारा पाणीपुरवठा सध्या बंद आहे. येथील विद्युतपंपांचे देखील नुकसान झाले आहे. सध्या दुरूस्ती करण्याची परिस्थिती नसल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यास आणखी आठ दिवसांचा अवधी लागणार आहे.  

Related posts: