|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मिनी कचरावाहू वाहनांचा वापर करा

मिनी कचरावाहू वाहनांचा वापर करा 

बेळगाव / प्रतिनिधी

अकरा वॉर्डमध्ये महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांकरवी स्वच्छतेचे काम करण्यात येते. मात्र या वॉर्डमध्ये घरोघरी जाऊन कचरा उचल करण्याचे काम ठप्प झाले आहे. परिणामी कचऱयाची समस्या भेडसावत आहे. कचरा उचल करण्यासाठी खरेदी करण्यात आलेली वाहने मनपाच्या गॅरेजमध्ये थांबून आहेत. या वाहनांद्वारे टिळकवाडी भागातील कचऱयाची उचल करण्याची मागणी माजी नगरसेवक पंढरी परब यांनी केली आहे.

विशेषत: टिळकवाडी भागातील वॉर्ड क्र. 16, 17, 18, 19 आदी वॉर्डमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घरोघरी जाऊन कचरा उचल करण्याची संकल्पना या वॉर्डमध्ये राबविली होती. याकरिता माजी नगरसेवक पंढरी परबसह परिसरातील संघटनांनी पुढाकार घेतला होता. यामुळे या संकल्पनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत होता. पण ही मोहीम व्यवस्थितपणे राबविण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे.

कचरा उचल करण्यात यावी याकरिता महापालिकेत नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करीत होते. पण सध्या सभागृह अस्तित्वात नसल्याने अधिकाऱयांची मनमानी सुरू आहे. स्वच्छतेच्या समस्यांबाबत अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी कानाडोळा केला आहे. यामुळेच दर 8-15 दिवसाला वाहने नादुरूस्त होण्याचे प्रकार आणि कचरा उचल करण्याचे कामकाज ठप्प होत आहे. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस व कचऱयाची उचल ठप्प झाल्यामुळे रोगराई फैलावण्याचा धोका आहे. पण याबाबत महापालिका प्रशासन ढीम्मच आहे. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यासाठी महापालिकेने लहान आकाराची कचरावाहू वाहने खरेदी केली आहेत. महिना झाला तरी सदर वाहनांचा वापर सुरू करण्यात आला नाही.

पावसाचा कहर अशातच कचरावाहू कॉम्पॅक्टर नादुरूस्त असल्यामुळे कचऱयाची उचल झाली नाही. अशावेळी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचा वापर करून स्वच्छतेचे काम करणे आवश्यक होते. पण याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचा वापर करून स्वच्छतेचे काम करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक पंढरी परब यांनी केली आहे.

Related posts: