येडूरला अद्याप पुराचा वेढा

जवानांकडून सुटका : पाणीपातळीत किंचीत घट
वार्ताहर / येडूर
येडूर परिसराला गेल्या आठ दिवसापासून महापुराने वेढले आहे. कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे येडूरसह परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथील जवळपास 1 हजारहून अधिक नागरिकांना एनडीआरएफ व एसडीआरएफच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. मंगळवारी कृष्णा नदीच्या पाणीपातळीत थोडय़ा प्रमाणात घट झाली आहे. मात्र अद्यापही येडूर, चंदूर, मांजरी, येडूरवाडी, गावांना पुराचा वेढा कायम आहे.
पावसाचा जोर ओसरला असला तरी कृष्णा काठावरील परिस्थिती गंभीरच आहे. शेतीसह अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. संपूर्ण गावच जलमय झाल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरण क्षेत्रातील पाऊस ओसरला असून पाणलोट क्षेत्रातील धरणातून होणाऱया पाण्याच्या विसर्गात घट झाल्याने एक-दोन दिवसात कृष्णेच्याही पाणीपातळीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निसर्गाच्या जलप्रकोपाचा मोठा दणकाच चिकोडी उपविभागाला बसला असून, 2005 पेक्षाही हा महापूर मोठा असल्याने लोकांना स्वत:चा जीव वाचवण्यासाठी स्थलांतरीत होण्याचा प्रसंग उद्भवला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाला थोपविण्यास आज विज्ञान देखील काही करु शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. येडूर परिसराला या जलप्रकोपाने न भुतो अशी ऐतिहासिक नोंद केली आहे.