कृष्णा नदीकाठ परिसराला स्मशानकळा

वार्ताहर/ अथणी
अथणी तालुक्यात कृष्णा नदीकाठ परिसराला महापुराने गेले आठ दिवस झाले स्मशानकळा आली आहे. शेकडो घरे पडली असून शेकडो जनावरे मृत झाली आहेत. हजारो हेक्टर शेतीमधील पिके कुजली आहेत. घरातील सर्व साहित्य पूर्णपणे खराब झाले आहे. महापूर परिसरात अवकळा निर्माण झाली आहे.
कृष्णाकाठच्या परिसरात हिप्परगी धरणापासून मंगावतीपर्यंत भाग बागायत सधन म्हणून ओळखला जातो. परंतु महापुराने या भागाला मदत मागण्याची वेळ आली आहे. जनवाड, महेशवाडगी, नंदेश्वर, दर्गा, सवदी, सत्ती, औरखोड, हल्याळ, नदी इंगळगाव, तीर्थ, सप्तसागरसह या परिसरात असणारी गावे बागायतदार गावे म्हणून ओळखली जातात. मात्र आता या महापुराने गावे कोठे आहेत. याचा शोध घ्यावा लागत आहे.
पिके पाण्यात राहिल्याने कुजली आहेत. पिकात माती, पाणी जाऊन बसले आहे. ऊस पिकाला कोंब येऊन वजन घटण्याची शक्यता आहे. असा ऊस कारखाना नेऊ शकत नाही. जनावरे वाहून गेली आहेत. त्याचा अंदाज अधिकाऱयांना कसा लागणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापुराने वेढा टाकलेली अथणी-कागवाड तालुक्यातील एकूण 32 गावे पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे पाणी गेलेल्या घरात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, अंथरुण, खाट, गादी सर्व भिजून उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने दिलेली मदत पुरत नाही. परत माणसात यावे तर नवीन जन्म झाल्यासारखे आहे. पाणी कमी झाल्यानंतर रोगराईचा धोका मोठा आहे. पाणी कमी होत आहे. परंतु रस्ते सुरू झालेले नाहीत.
2005 मध्ये सरकारने यांना जागा, घर याची भरपाई दिली होती. पण तरीही येथेच राहिल्याने महापुरात बुडून संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अथणी तालुक्यात कृष्णा नदीस इतिहासातील सर्वात मोठा महापूर आला आहे.