|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कृष्णा पात्रात : भग्न संसार रस्त्यावर

कृष्णा पात्रात : भग्न संसार रस्त्यावर 

नदी पातळी इशारा पातळीखाली : महाकाय मगरीचे दर्शन : वीज मिटरची गतीने जोडणी 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली अनेक भागात कचऱयाचे अक्षरश: डोंगर उभारले आहेत. कृष्णा नदीपात्रात आणि लोकांचे मोडलेले घर संसार रस्त्यावर, अशी स्थिती आहे. त्यातच बायपास रोडवर महाकाय मगरीने दर्शन दिले आहे. घरवापसी आणि घर-दुकान स्वच्छतेसाठी पूरग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे. स्वच्छता मोहीम जोरावर आहे. शहरात भंगार आणि भिजलेले कपडे गोळा करणाऱयांच्या टोळय़ा आल्या आहेत. तर साफसफाई, मजुरी, जनरेटर आणि पाणी उपसा इंजिनचे दर तिप्पट झाले आहेत. वीज मंडळाने गतीने जोडण्या सुरू केल्या असल्या तरी पाणीपुरवठा ठप्प आहे. शामरावनगरात आणखी एक मृतदेह मिळाला आहे. अनेक भागातून औषध, कपडे, धान्ये, फळे, चादरी येत आहेत आणि उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, शर्मिला ठाकरे, जयंत पाटील आणि ऍड. मनोज आखरे यांनी पूरग्रस्त भागात दौरे करून विचारपूस केली.

पाऊस थांबला आणि पूर ओसरू लागला, याचे समाधान असले, तरी नागरी वस्तीत महाकाय मगरीने दर्शन दिले आहे. बायपास रस्त्यावर दहा फूट लांब गलेलठ्ठ मगर उन्हाला पडली होती. शहरात घरात पुन्हा राहायला येण्यासाठी व्यापार-उद्योग कार्यालय सुरू करण्यासाठी पूरग्रस्तांचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक जोडीला अन्य पालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी हातभार लावला असला, तरी स्वच्छता हे मोठे आव्हान बनले आहे. अनेकांचे भिजलेले संसार मोडून आणि विस्कटून रस्त्यावर आले आहेत. ट्रक्टर आणि कचरा उठाव ट्रकच्या माध्यमातून हा कचरा गोळा करून एकत्र करत आहेत. त्याचे कोल्हापूर रोडसह ओबीसी बँकेनजीक आणि विविध भागात डोंगर झाले आहेत. घर-अपार्टमेंट स्वच्छतेसाठी मजुरीचे दर तिप्पट झाले आहेत. केरसुण्या, खराटे, जंतूनाशके आणि डांबर गोळय़ांना मागणी आहे. बेसमेंटमधील पाणी उपसायला तासाला 500 ते 1000 रूपये घेतले जात आहेत, तर जनरेटरचे दरही अव्वाच्या-सव्वा झाले आहेत. रस्ते मोकळे झाल्याने, मदतीचा ओघ सुरूच आहे. स्वातंत्र्यदिनाची तयारीही सुरू आहे. जेलमधील स्वच्छता आणि बाजूच्या शाळेतच हलवलेल्या महिला कैद्यांना पुन्हा आत नेण्यात आले आहे.

तब्बल दहा दिवसांनी कृष्णा नदी पात्रात आली. बुधवारी सायंकाळी आयर्विन पातळी 36 फुटाच्या खाली आली. नदी पाणीपातळी उतरत असल्याने महापुराने वाहतुकीला बंद झालेले जिह्यातील बहुतांशी मार्ग पुन्हा खुले झालेले आहेत. डेनेज चोकअपमुळे मारूती चौकातील पाणी मात्र तुंबून राहिले आहे. शहरामध्ये स्वच्छतेला गती आली असून रस्त्यांवर कचऱयाचे ढीगच ढीग साठले आहेत. दरम्यान, पूर बाधितांचे पंचनामे करण्याबरोबर त्यांना प्रतिकुटुंब रोख पाच हजार इतके सानुग्रह अनुदान देण्याच्या कामालाही गती आली आहे.

कृष्णा आणि वारणा धरण क्षेत्रात पडलेल्या अतिवृष्टी नदीकाठची गावे आणि शेती पाण्याखाली गेली आहे. सुमारे दीडशे गावांत पाणी घुसले, तर दीड लाख हेक्टर शेतीमध्ये पाणी घुसले, तीन लाखांवर लोकांना आणि 25 हजारावर जनावारांना स्थलांतरीत करावे लागले. या पुराच्या पाण्याने कोटय़वधीचे नुकसान झाले असले तरी नुकसानीच्या आकडय़ाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. महापुराने विक्रमी पातळी गाठली होती. धरणक्षेत्रात पाऊस थांबल्याने गेल्या तीन दिवसांपासून महापुराला उतार सुरू झाला आहे.

मंगळवारी रात्री आयर्विनची पातळी 44 फुटावर होती. यामध्ये घट होवून बुधवारी सकाळी 40 फूट झाली. तर सायंकाळपर्यंत आणखी तीन फुटाची घट होवून 37 फुटापर्यंत खाली आली. गुरूवारी सकाळपर्यंत 35 फुटाच्या खाली पातळी येण्याची शक्यता आहे. पुराने वाहतुकीला बंद झालेले बहुतांशी रस्ते खुले झाले आहेत. शहराची पुराच्या पाण्याने नाकाबंदीच केली होती. येथील रस्त्यावरील वाहतुकही सुरूळीत झाली आहे. मारूती चौक आणि शिवाजी मंडई परिसरामध्ये मात्र अद्याप तीन ते चार फूट पाणी आहे.

दरम्यान, महापूर ओसरताच सर्वत्र साफ सफाईला वेग आला आहे. सफाईसाठी मुंबई, पुणे, वाई, नगर, उस्मानाबाद, सोलापूर, कराड आदी गावांसह राज्यातील मनपाची यंत्रणा दाखल झाली असून युध्दपातळीवर काम सुरू झाले आहे. शहरामध्ये पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. गेली दोन दिवसांपासून घरे आणि दुकानात गेलेले पाणी काढण्याबरोबरच सफाई केली जात आहे. भिजलेले साहित्य बाजूला काढण्यात येत आहे. कचरा, पाण्याबरोबर आलेला गाळ तसेच खराब झालेल्या साहित्य रस्त्यावर टाकले असून याचे ढीग चौका चौकात पडले आहेत. शहरास पूरभागात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती आहे. यावर उपायोजना म्हणून जंतूनाशक फवारणी पथके कार्यरत ठेवली आहेत.

पंचनामे आणि सानुग्रह अनुदान वाटपाला गती

नुकसान झालेल्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. शहरी भागात प्रति कुटुंब 15 तर ग्रामीण भागात 10 हजार इतकी मदत देण्यात येणार आहे. यासाठी पंचनामे केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी दोन हजारांवर अधिकारी आणि कर्मचाऱयांची नियुक्ती केली असून दोन दिवसांपासून त्यांचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात प्रति कुटुंब पाच हजार इतके सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. हे कामही सुरू झाले आहे. पूर भागातील कुटुंबाला रेशन कार्ड व आधार कार्ड दाखविल्यानंतर ही मदत रोख स्वरूपात दिली जात आहे. तर उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

Related posts: