|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूर, दुष्काळ तरीही तिरंग्याची विक्रमी विक्री

पूर, दुष्काळ तरीही तिरंग्याची विक्रमी विक्री 

हुबळी :

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हद्दपार करण्यात आल्यानंतर तेथील दोन्ही नव्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय ध्वजाची मागणी वाढल्याचे समोर आले आहे. दिल्ली येथील खादी भवन तसेच कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ फेडरेशनच्या दालनांमध्ये विक्री झालेले राष्ट्रीय ध्वज जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख येथे पाठविले आहेत. सैन्य कार्यालये, शासकीय संस्था तसेच अन्य संस्थांनी ध्वजाची खरेदी केली आहे.

श्रीनगर, जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील राष्ट्रीय ध्वजाची मागणी वाढल्याची पुष्टी फेडरेशनचे महासचिव शिवानंद मथपटी यांनी दिली आहे. नेमक्या किती प्रमाणात राष्ट्रीय ध्वजाची विक्री झाली आहे, हे सांगणे अवघड असल्याचे त्यांनी म्हटले.

उत्तर कर्नाटकाला पूर तसेच पावसाचा फटका बसला तरीही बेंगारी खादी फेडरेशनच्या व्यवहारांवर मोठा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येते. पावसामुळे ध्वजाच्या वाहतुकीला प्रारंभी अडथळा आला होता. तो आता दूर करण्यात आला आहे. विक्री तसेच निर्मिती प्रक्रियेवर फार मोठा प्रभाव पडला नसल्याचे मथपटी यांनी म्हटले.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रमाणात राष्ट्रीय ध्वज पंजाबमध्ये पाठविण्यात आले आहेत. विविध आकाराच्या 6 लाखाहून अधिक ध्वजांची विक्री झाली आहे. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात ध्वजाची मागणी अधिक आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पाटणा येथून सर्वाधिक मागणी आहे.

एप्रिलपासून आतापर्यंत 9545 राष्ट्रध्वज निर्माण करण्यात आले असून जुन्या साठय़ासह एकूण 11780 ध्वजांची विक्री झाली आहे. 26 जानेवारीपर्यंत यातून 2.11 कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

Related posts: