|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे सर्व्हे करावा

अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे सर्व्हे करावा 

आमदार उमेश कत्ती यांची सूचना : हुक्केरीत आढावा बैठक

वार्ताहर /   हुक्केरी

तालुक्यात महापुरामुळे 40 गावांना फटका बसला असून सध्या पाऊस कमी होत आहे. तालुका पातळीवरील अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे सर्व्हे करावा, अशा सूचना आमदार उमेश कत्ती यांनी दिल्या. ते तहसीलदार कार्यालयातील सभागृहात तालुका पातळीवरील अधिकाऱयांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

कत्ती पुढे म्हणाले, तालुक्यात अंदाजे 40 हजार हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. 1300 घरे पडली असून कांही पशूंचा मृत्यू झाला आहे. तर अनेक कुटुंबे आपली घरे सोडून सुरक्षितस्थळी गेली आहेत. हजारो कुटुंबे निवारा केंद्रात आहेत. त्यांना शासनाच्यावतीने मदत सुरू असून अधिकाऱयांनी रात्रंदिवस सर्व्हे करून तहसीलदार रेश्मा ताळीकोटी व नोडल अधिकारी नागराज पाटील यांना माहिती द्यावी, असे सांगितले.

निवारा केंद्रात नोंद झालेल्या प्रत्येक कुटुंबाला ताबडतोब कपडे व भांडी घेण्यास शासनाच्यावतीने 3 हजार 800 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. ते काम लवकरात लवकर करण्यात येणार आहे. त्यांनतर घरे व पीक नुकसानीचा सर्व्हे करण्यात येईल. संबंधित ग्रामपंचायतीतील सचिव व नोडल अधिकारी वर्ग पडलेल्या घरांचा सर्व्हे करतील. तर पीक नुकसानीचा सर्व्हे कृषी अधिकारी, फलोद्यान अधिकारी, रेशीम अधिकारी व शहरातील तलाठी करणार आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी कसून प्रयत्न करा

हुक्केरी, संकेश्वर व इतर 28 ग्रामीण गावांसाठी पाणी येत नसल्याने अनेक समस्या होत आहेत. मात्र जॅकवेल, पंपहाऊस व पाईपलाईन पाण्यात बुडाल्याने त्यांची दुरुस्ती करण्यात येत आहेत. तसेच संकेश्वरमध्ये काही भागात टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, हुक्केरीत 21 कूपनलिका सुरू आहेत. येथून त्वरित पाणीपुरवठा सुरू होईल यासाठी अधिकाऱयांनी कसून प्रयत्न करावेत, असेही कत्ती यांनी सांगितले. तालुक्यात सहा म्हैशी, दोन कोंबडी व 1 घोडा या पशूंचा बळी गेला आहे. त्यामुळे सदर पशूपालकांना मदत निधी देण्यात आली असल्याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली. आमदार कत्ती यांनी जनावरांना चारा मिळत नाही अशी शेतकरी तक्रार करीत असून त्यांची ही समस्या मार्गी लावण्यास सांगितले.

पोलिसांना आदेश

हिडकल डॅम, मार्कंडेय डॅम व चित्री डॅम फुटला म्हणून अफवा उठत आहेत. याचा गैरफायदा काही समाजकंटक घेत मोकळय़ा घरात चोरी करीत आहेत. तसेच जनावर पळवून नेत आहेत. यासाठी त्या त्या गावातील बीट पोलिसांनी सतर्क राहून अफवा उठविणाऱयांवर कारवाई करा, असे आमदार कत्ती यांनी सांगितले.

आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे

महापुराचे कमी होत असून आता पूरग्रस्तांसमोर रोगराईचे आवाहन आहे. त्यामुळे आता आरोग्य खात्याची जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे सर्व परिसरात फॉगिंग, डीडीटी पावडर यांची फवारणी करावी. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, तसेच आरोग्यासंबंधी काहीही तक्रार वाटल्यास त्वरित वैद्यााधिकाऱयांना भेटा, असे तहसीलदार रेश्मा ताळीकोटी यांनी सांगितले.

 

Related posts: