|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूरग्रस्तांना वेध घरी परतण्याचे

पूरग्रस्तांना वेध घरी परतण्याचे 

प्रतिनिधी/   चिकोडी

धोका पातळी ओलांडलेल्या कृष्णेची पातळी खालावत असून कृष्णा काठावरील चिकोडी उपविभागातील 119 पूरग्रस्त गावातील नागरिकांना आता निवारा केंद्रातून आपल्या घरी जाण्याचे वेध लागले आहे. पण काही बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्याने त्यांना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. महापुराच्या पाण्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाण्यात बुडलेल्या 119 गावांचा संपर्क हळूहळू पूरपदावर येत आहे. 

प्रशासनाने देऊ केलेल्या प्रति कुटुंबास 3800 रुपयांचा तुटपुंजा निधी पूरग्रस्त जनतेची घरे स्वच्छ करण्यासाठीही कमी पडतो याची खंत उराशी बाळगून, पुन्हा जोमाने आपला संसार उभारण्याशिवाय पर्याय नाही. हे ओळखून, पूरग्रस्त आपल्या नातेवाईकांकडून उसनवारी करण्यावर भर देत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या निवारा केंद्रावरील परिस्थिती जैसे थे आहे. काही पूरग्रस्त पाणी कमी झाल्याने गावाकडे फेरफटका मारुन, आपल्या घरांची पडझड बघून हाताश मनाने पुन्हा निवारा केंद्राकडे येत असल्याचे चित्र चिकोडी उपविभागात पहावयास मिळत आहे.

पावसाच्या प्रमाणात घट

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कृष्णेत कल्लोळ येथे येणाऱया पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण पाणीपातळी अत्यंत संथगतीने कमी होत आहे. बुधवारी कोयना येथे 9 मि. मी, नवजा 22, महाबळेश्वर 50, वारणा 1, काळम्मावाडी 4, राधानगरी 15, पाटगाव 32, कोल्हापूर 1 तर सांगली येथे 00 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर चिकोडी तालुक्यात चिकोडी शहर वगळता कोठेही पावसाची नोंद झालेली नाही. चिकोडीत केवळ 0.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

सर्व मार्ग बंदच

चिकोडी व निपाणी तालुक्यातील सर्वच्या सर्व पूल व बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत. येत्या एक-दोन दिवसात एकसंबा-दानवाड, सदलगा-बोरगाव व मलिकवाड-दत्तवाड हे बंधारे वाहतुकीसाठी खुले होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राजापूर जलाशयातून अद्यापही 2 लाख 34 हजार 482 क्युसेक्स पाणी कृष्णेत येत असल्याने असेच दूधगंगेतूनही 50864 क्युसेक्स पाणी येत असल्याने पाणीपातळी अपेक्षेअनुरुप खालावताना दिसत नाही. बुधवारी हिप्परगी जलाशयातून 4 लाख 24 हजार क्युसेक्स पाण्याची आवक-जावक होत आहे. आलमट्टी जलाशयात 5 लाख 50 हजार क्युसेक्स पाणी येत असून 5 लाख 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

साहित्याची जुळवा-जुळव

चिकोडी उपविभागातील काही पूरग्रस्त गावात पूर ओसरत असून तेथील पूरग्रस्त आता आपल्या घरांची स्वच्छता व दुरुस्तीसाठी लगबगीने साहित्याची जुळवा-जुळव करत आहेत. काही दानशूर संघ-संस्थाद्वारे घरांच्या दुरुस्तीसाठी लागणाऱया साहित्याचेही वितरण करत असून, हे साहित्य घेण्यासाठी पूरग्रस्तांची धावपळ सुरू झाली आहे. हे पूरग्रस्त आता अन्न-धान्या ऐवजी आपल्याला घरे उभारण्यासाठी मदत झाली तर फार चांगले होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Related posts: