|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बुदिहाळमधील हुतात्मा प्रकाश जाधव यांना कीर्ति चक्र

बुदिहाळमधील हुतात्मा प्रकाश जाधव यांना कीर्ति चक्र 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीर चक्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच स्क्वाँड्रन लीडर मिंती अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक तर हुतात्मा सैनिक प्रकाश जाधव व सीआरपीएफमधील डाय-कमांडंट हर्षपाल सिंग यांना कीर्ति चक्र पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे. बुधवारी या पुरस्कारांची घोषणा झाली असून स्वातंत्र्यदिनी अन्य 14 जणांना शौर्य चक्र प्रदान केले जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करत भारताने या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱयांना धडा शिकवला होता. त्यात बहुमूल्य कामगिरी बजावणाऱयांचाही स्वातंत्र्यदिनी गौरव केला जाणार आहे. देशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱया सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते. पाकिस्तानच्या एफ-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत अभिनंदन यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याने त्यांचा वीर चक्राने सन्मान होणार आहे. वीर चक्र हा तिसऱया क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.

अभिनंदन यांचे अभूतपूर्व शौर्य

शत्रूला धूळ चारण्यात दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी अभिनंदन यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही त्यांनी आपल्या कणखरपणाचे दर्शन घडवले होते. शत्रू राष्ट्राला देशासंबंधीची कोणतीही संवेदनशील माहिती कळू दिली नव्हती. त्यानंतर ते सुखरुप मायदेशात परतले होते. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकता असल्याने अलीकडेच त्यांची श्रीनगर येथील हवाई तळावरून पश्चिम सेक्टरमधील भारत-पाक सीमेवरील दुसऱया महत्वाच्या हवाई तळावर बदली करण्यात आली. अभिनंदन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती.

मिंती अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक

स्क्वॉड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाई संघर्षादरम्यान त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच

‘बालाकोट’च्या किमयागारांचाही गौरव

फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर 12 दिवसांनी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राईकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या पाच वैमानिकांचा त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विंग कमांडर अमित राजन, स्क्वॉड्रन लिडर राहुल बसोया, पंकज भुजाडे, बी. एन. के रेड्डी आणि शशांक सिंग या वैमानिकांना हवाई दलाकडून वायूसेना पदक (मेडल ऑफ गॅलेंट्री) देण्यात येणार आहे. या पुरस्कार विजेत्यांची नावे यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र, आता पुरस्कार मिळाल्याने ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Related posts: