|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » ‘दगडूशेठ’ घेणार पूरग्रस्त गाव दत्तक

‘दगडूशेठ’ घेणार पूरग्रस्त गाव दत्तक 

पुनर्वसनासाठी 10 कोटींचा निधी

पुणे / प्रतिनिधी :

कोल्हापूर, सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच देवस्थाने व मंडळांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टदेखील या भागातील एका गावच्या उभारणीकरिता पुढाकार घेत आहे. सध्या सुरु असलेली शासनाची मदत व पूरस्थिती निवळल्यानंतर आवश्यकतेनुसार टप्याटप्याने मदत कार्य सुरु केले जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात ट्रस्टचे उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने हे असून, 10 कोटी रुपयांची मदत ट्रस्टतर्फे देण्यात येणार आहे. गावातील सर्व घरे, मंदिरे, शाळा आणि मशिददेखील ट्रस्टने दिलेल्या निधीतून आवश्यकतेनुसार टप्याटप्याने उभारण्यात येईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

काळभैरवनाथ तरुण मंडळ राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय गणेशोत्सव’ स्पर्धेत पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे, तर सिटी पोस्ट चौकातील महाराष्ट्र तरुण मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, गुरुवार पेठेतील वीर शिवराय मित्र मंडळाने चौथे, तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या 156 मंडळांपैकी 98 मंडळांनी पारितोषिके मिळविली असून, ट्रस्टच्या वतीने एकूण 12 लाख 6 हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या मंगळवारी सायंकाळी 6 वाजता गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

Related posts: