|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » संपूर्ण कर्जमाफी मिळावी

संपूर्ण कर्जमाफी मिळावी 

व्यापाऱयांची मागणी : पूरग्रस्त व्यापारी मोर्चाची स्थापना

प्रतिनिधी/ सांगली

कृष्णेच्या पुराने व्यापाऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने योग्यप्रकारे पंचनामा करुन व्यापाऱयांना 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी. शासनाने  बँकांमध्ये असणारी व्यापाऱयांची सर्व कर्जे माफ करावीत. पूरग्रस्त व्यापाऱयांच्या मागण्यांसाठी ‘पूरग्रस्त व्यापारी मोर्चा’ची स्थापना करण्याचा निर्णय व्यापाऱयांच्या बैठकीत घेण्यात आला.

चेंबर ऑफ कॉमर्स व जिह्यातील व्यापारी उद्योजक असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी राजमती भवन येथे पूरग्रस्त व्यापाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, माजी अध्यक्ष मनोहर सारडा, माजी महापौर सुरेश पाटील, मिरज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विराज कोकणे, किरकोळ किराणा भुसार संघटनेचे अरुण दांडेकर, ट्रान्सपोर्ट संघटनेचे बाळासाहेब कलशेट्टी यांच्यासह विविध व्यापारी व उद्योजक संघटना व व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बैठकीत व्यापाऱयांचे दुकान व गोडावून येथील माल, दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांची 100 टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, कागदपत्रे नष्ट झाल्याने जीएसटीची रक्कम व रिटर्न भरण्यासाठी किमान एक वर्षाची मुदत मिळावी, बिलाची पडताळणी करणे आवश्यक झाल्याने आयकर ऑडीट करणे व रिटर्न भरण्यास सहा महिन्यांची मुदत मिळावी, जिह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील नाशवंत मालाचे पंचनामे करुन शेतीमालाचा सेस व सेवाशुल्क एक वर्षांसाठी माफ करावा, छोटेखानी व्यावसायिकांना उभारी मिळण्यासाठी खास बाब म्हणून कर्जपुरवठा करावा, विमा कंपन्यांनी नुकसानीची रक्कम त्वरित द्यावी, दुकानात काम करणाऱया कर्मचारी वर्गास एक महिना वेतनाएवढी रक्कम द्यावी, अशा मागण्यांचा निर्धार करण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात येणार आहे.

राज्यातील पूरग्रस्त व्यापाऱयांसाठी 300 कोटी रुपये मंजूर

सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा म्हणाले, शहरातील 60 टक्के भाग पाण्याखाली गेल्याने लहान-मोठय़ा सर्वच उद्योजक व व्यापाऱयांना मोठा फटका बसला आहे. मारुती रोड, हरभट रोड, कापड पेठ ते वखारभागापर्यंतच्या सर्व व्यापारपेठांचे नुकसान झाले आहे. राज्यातील पूरग्रस्त व्यापाऱयांना नुकसान देण्यासाठी राज्य शासनाने 300 कोटी रुपये पहिल्यांदाच मंजूर केले आहेत. मात्र, ही रक्कम नुकसान भरुन निघण्यास पुरेशी नाही. यातून व्यापाऱयांना कमीत कमी 50 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱयांचा सामूहिक आवाज उठविण्यासाठी सांगली चेंबर ऑफ कॉमर्स पुढे आली आहे.

हलगर्जीपणा करणाऱयांवर कारवाई करा

मिरज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विराज कोकणे म्हणाले, प्रशासनातील अधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. या मोठय़ा नुकसानीस जबाबदार कोण? हे शासनाने सांगावे. व्यापाऱयांच्या झालेल्या नुकसानीची 100 टक्के भरपाई सरकारने द्यावी.

तीन वर्षांकरिता मनपा कर माफ करा

उद्योजक अरुण दांडेकर म्हणाले, पुरात अनेकांचे लाखात नुकसान झाले आहे. अनेकांची जमा-खर्च वही पाण्यात गेल्याने नुकसानीचा अंदाज करणे कठीण आहे. विमा कंपन्या भरपाई देण्यास टाळाटाळ करत असून त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची गरज आहे. महापालिकेने व्यापाऱयांना तीन वर्षे घरपट्टी, पाणीपट्टी आदी कर माफ करावेत, असे दांडेकर म्हणाले.

बँकांनी व्यापाऱयांची सर्व कर्जे माफ करावीत

माजी महापौर सुरेश पाटील म्हणाले, छोटय़ा-मोठय़ा व्यापारी व उद्योजक संघटनांच्या एकत्रिकणातून पूरग्रस्त व्यापारी मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक, राज्य व केंद स्तरावर विविध मागण्यांसाठी या मोर्चाद्वारे लढा देण्यात येणार आहे. शासनाने सीएसआरमधील निधी पहिला हप्ता म्हणून व्यापाऱयांच्या मदतीसाठी द्यावा. पुरामुळे व्यापारी रस्त्यावर आले असून तिघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे बँकांनी पूरग्रस्त व्यापाऱयांची सर्व कर्जे माफ करावीत, असा आग्रह धरला.

एकूण जीएसटीच्या 25 टक्के माफी मिळावी

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रवि राजमाने म्हणाले, राज्य व्यापारी संघटनेने सरकारकडे बँक कर्जमाफी, जीएसटी माफी व 100 टक्के नुकसान भरपाई या तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या 3 जुलै 2017 च्या परिपत्रकानुसार कर्जमाफीची रितसर मागणी केली आहे. व्यापारी संघर्ष समितीचे प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची भेट घेणार असून व्यापाऱयांनी आतापर्यंत भरलेल्या एकूण जीएसटीच्या 25 टक्के रकमेची माफी करण्याची मागणी करणार आहे.

जिल्हा पानपट्टी संघटनेचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी, डॉ. जयश्री पाटील, वसंतदादा औद्योगिक वसाहत सोसायटीचे अध्यक्ष सचिन पाटील, मिरज एमआयडीसीचे माधव कुलकर्णी, टेलर्स असो.चे बसवराज पाटील, लघु उद्योग संघटनेचे अनंत चिमड, संजय बजाज, करीम मेस्त्राr, विराज कोकणे, रत्नाकर नांगरे आदी उद्योजक उपस्थित होते.

 

प्रमुख मागण्या

-शंभर टक्के नुकसानभरपाई मिळावी

-बँकांची कर्जे माफ व्हावीत

-मनपाने तीन वर्षे कर माफ करावेत

-विमा कंपन्याकडून संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी

-लघु उद्योगासाठी खास बाब म्हणून पुनर्व्यवसायासाठी कर्ज मिळावे

-जीएसटीमध्ये 25 टक्के माफी मिळावी

Related posts: