|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापुराच्या तडाख्याला ‘राजकारणही’ जबाबदार

महापुराच्या तडाख्याला ‘राजकारणही’ जबाबदार 

धरणे आधीच भरुन घेतली: वेळेत योग्य विसर्ग केला नाही : विसर्ग किती व केव्हा यामागे राजकारण:

प्रतिनिधी/ सांगली

प्रचंड पाऊस, पूरपट्टय़ातील अतिक्रमणे, पाणी निचरा होणारे ओढे-नाले मुजवून उभे राहिलेले इमले याबरोबरच राजकारणही पुराचा फटका बसायला कारणीभूत झाले आहे. धरणातून पाणी किती, केव्हा साठवायचे व सोडायचे यांचा निर्णय कागदोपत्री कुणीही घेत असले तरी या निर्णयात राजकीय हस्तक्षेप आणि दबाव असतो, हे उघड सत्य आहे. महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र राज्याच्या विसर्ग व साठा यामध्ये कल्याणकारी संवाद व कार्यवाही नव्हती, असे चित्र समोर आले आहे.

पाऊस मोठा पडला, ढगफुटी झाली, पाऊस सर्वत्र व सलग होता. हे खरे पण, पूर नियंत्रण हा विषय धरण पाटबंधारे वरिष्ठ अधिकारी हाताळू शकतात. परंतु त्यांना यश आलेले नाही. अलमट्टीने शेवटच्या टप्प्यात पाच लाख क्युसेक विसर्ग सुरु केला. तथापि ही कृती प्रारंभीच करण्याची गरज होती. वारणा व कोयना धरणे पूर्ण भरली आणि त्याचवेळी सर्वत्र प्रचंड पाऊस होता. तेंव्हाच दोन्ही धरणातून मोठा विसर्ग सुरु करण्यात आला. या सर्वांचा फटका सांगलीसह कृष्णाकाठाला बसला. हे वास्तव आहे. अलमट्टीने आणि कोयना धरणाने 1 तारखेपासूनच मोठा विसर्ग केला असता तर वेगळे चित्र दिसले असते. पण, मोठा विसर्ग करण्याविषयीचा निर्णय वेळेत झाला नाही आणि त्यासाठीचा आंतरराज्य संवाद नव्हता, अशी टीकाटिप्पणी वरुन दिसते. त्यामध्ये राजकारणही आहे.

मुळात 15 ऑगस्टपर्यंत धरणे निम्म्यापेक्षा रिक्त ठेवावीत आणि नंतर या रिक्त धरणाचा वापर पूर नियंत्रणासाठी करावा, असे संकेत आहेत. पण, ते पाळले जात नाहीत. त्यामध्ये राजकीय दबाव व आंतरराज्य विसंवाद दिसतो. शालेय अभ्यासक्रमातही धरणांचे जे प्रमुख उपयोग सांगितले आहेत. त्यामध्ये पूर-महापूर नियंत्रण हा प्रमुख उपयोग असे म्हटले आहेत.  फार पूर्वी धरणे नव्हती तेव्हा पूर येत असे. पण, असा विध्वंस होत नव्हता. बेंदूर, नागपंचमी, राखीपौर्णिमा यावेळी नदी दुथडी व्हायची. पण, गणपती मंदिरात, गणपती पेठेत कधी पाणी जात नव्हते. 2005 आणि 2019 चा महाप्रलयकारी महापूर हा धरणांचा योग्य वापर न केल्याने आला, अशी हळू आवाजात चर्चा आहे.

धरणे निम्मी रिक्त ठेवली असती व 1 तारखेपासून कोयना व अलमट्टीतून मोठा विसर्ग केला असता तर पूर आला नसता आणि इतका विध्वंस झाला नसता. पण, अधिकारी व राजकारणी चर्चा करत राहिले. समुद्रसपाटीपासूनची उंची सांगू लागले व धरणे तुडुंब भरली. पाऊस कोसळत होता आणि मग, मोठा विसर्ग अपरिहार्य झाला. याचा परिणाम होऊन सांगलीसह कृष्णाकाठ बुडाला. राजकारण झाले नसते, अधिकाऱयांना विसर्गासाठी मोकळीक दिली असती आणि पूरपट्टय़ात तोडपाणी करुन इमले उठवाण्यासाठी राजकारण केले नसते तर वेगळे चित्र दिसले असते. पण, संबंधित यंत्रणेने आणि राजकीय मंडळींनी 2005 साली धडा घेतला नाही आणि आता 2019 सालीही घेतली, असे वाटत नाही. लोकांनीच लक्ष ठेवले पाहिजे आणि लोककल्याणकारी दबाव आणला पाहिजे. धरणाचा उपयोग पूर नियंत्रणासाठी झाला पहिजे. पण, तो होताना दिसत नाही, हीच खेदजनक बाब आहे.

 

 

Related posts: