|Monday, January 20, 2020
You are here: Home » क्रिडा » बेन स्टोक्सचे नाबाद शतक

बेन स्टोक्सचे नाबाद शतक 

कांगारूंना 267 धावांचे आव्हान, 24 षटकाअखेर 3 बाद 80 धावा

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लंडने ऍशेस मालिकेतील दुसऱया कसोटीच्या शेवटच्या दिवशी दुसरा डाव 5 बाद 258 धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियाला 47 षटकांत 267 धावांचे विजयाचे आव्हान दिले होते. शेवटच्या बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 21 षटकांत 3 बाद 69 धावा जमविल्या होत्या आणि त्यांना अजून 198 धावांची गरज होती.

इंग्लंडने पहिल्या डावात 258 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 250 धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने मानेला चेंडू लागल्यानंतर पुन्हा मैदानावर येत आणखी 12 धावांची भर घालून 92 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर इंग्लंडने चौथ्या दिवशीअखेर दुसऱया डावात 4 बाद 96 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून शेवटच्या दिवसाच्या खेळास सुरुवात केली आणि 5 बाद 258 धावांवर डाव घोषित केला. बेन स्टोक्सने नाबाद 115 धावा जमविताना 165 चेंडूत 11 चौकार, 3 षटकार मारले. त्याने बटलरसमवेत पाचव्या गडय़ासाठी 90 धावांची भागीदारी केली. बटलरने 31 धावा केल्या. सहाव्या गडय़ासाठी स्टोक्सने बेअरस्टोसमवेत अभेद्य 97 धावांची भर घातली. बेअरस्टो 37 चेंडूत 30 धावांवर नाबाद राहिला. अवांतराच्या रूपात इंग्लंडला 25 धावा मिळाल्या. याशिवाय डेन्लीने 26, बर्न्सने 29 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने 3 तर सिडलने 2 बळी मिळविले.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावाला सावध सुरुवात केली. पण आर्चरने वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांना स्वस्तात बाद करून सहाव्या षटकातच 2 बाद 19 अशी त्यांची अवस्था केली. स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या लाबुशेनने बॅन्क्रॉफ्टसमवेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण बँक्रॉफ्ट 16 धावा काढून बाद झाला. 24 षटकाअखेर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 80 धावा जमविल्या होत्या. लाबुशेन 31 व ट्रव्हिस हेड 10 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 258, ऑस्ट्रेलिया प.डाव 250, इंग्लंड दु.डाव 5 बाद 258 डाव घोषित (बेन स्टोक्स नाबाद 115, बटलर 31, बेअरस्टो नाबाद 30, बर्न्स 29, डेन्ली 26, अवांतर 25, कमिन्स 3-35, सिडल 2-54), ऑस्ट्रेलिया दु.डाव (24 षटकाअखेर) 3 बाद 80 (लाबुशेन खेळत आहे 30, वॉर्नर 5, ख्वाजा 2, बँक्रॉफ्ट 16, आर्चर 2-26, लीच 1-8).

Related posts: